Sambhaji Bhide :  संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्या वक्तव्यानंतर पुण्यात काँग्रेस महिला आघाडीनं निषेध केला आहे.  'देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांना आधी टिकली लावायला सांगा. त्यानंतर आम्हाला आणि महिला पत्रकारांना टिकली लावायला सांगा. या सगळ्या गोष्टींची सुरुवात तुम्ही तुमच्या घरापासून करा. नंतर लोकांना सांगा', अशा शब्दात काँग्रेस महिला आघाडीच्या नेत्यांनी हल्लाबोल केला आहे.


संभाजी भिंडेंच्या वक्तव्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या महिला आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. पुण्यातील बालगंधर्व चौकात कॉंग्रेस महिला आघाडीच्या नेत्या आणि कार्यकर्त्या एकत्र आल्या होत्या. त्यांनी भिडेंच्या टिकलीवरील वक्तव्याचा निषेध केला. त्यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला. काल मंत्रालयात महिला पत्रकाराला आधी कुंकू लाग मग मी बोलतो, असं संभाजी भिडेंनी महिला पत्रकाराला उद्देशून म्हटलं होतं. त्यानंतर सगळीकडून त्यांच्यावर टीका झाली. 


कसं राहायचं आणि कसे कपडे घालायचे हा आमचा प्रश्न आहे. आज तुम्ही कुंकू लावा म्हणत आहात, उद्या जीन्स घालू नका म्हणाल. डोक्यावर पदर घ्यायला सांगाल. आम्ही तालिबानी नाहीत. आम्हाला संविधानाने काही हक्क दिले आहेत. शाहू-फुले -आंबेडकर यांच्या विचाराने देश चालतो. त्यामुळे महिलेनं कुंकू लावायचं की नाही लावायचं हे तुम्ही ठरवू नका, असा खोचक सल्लादेखील काँग्रेस महिला पदाधिकाऱ्यांनी केला आहे. 


आम्हाला भारत माता म्हणत असाल तर आमची भारत माता सर्वांना सामावून घेणारी आहे. मात्र तुमच्या सारख्या माथेफिरुंनी भारत मातेचं नाव खराब केलं आहे. मात्र आम्ही ते होऊ देणार नाही, आम्ही सगळ्या भारत माता आहोत. आंदोलनाच्या वेळी आम्ही सगळ्यांनी टिकल्या काढल्या कारण आम्ही भारताच्या लेकी आहोत. आम्ही तुम्हाला कोणतं धोतर घालतो असं विचारत नाही, त्यामुळे असले सल्ले आम्हाला देण्याचा अधिकार भिडेंना नाही, असं म्हणत महिला नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. 


संभाजी भिडे नेमकं काय म्हणाले होते?
महिला पत्रकाराशी बोलताना 'आमची अशी भावना आहे, प्रत्येक स्त्री भारतमातेचं रूप आहे. भारत माता विधवा नाही. कुंकू लाव, मग तुझ्याशी बोलेन,' अशी प्रतिक्रिया संभाजी भिडे यांनी दिली होती. यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. एका महिला पत्रकाराला केलेल्या वक्तव्यानंतर संभाजी भिडे हे पुन्हा वादात सापडले आहेत. संभाजी भिडे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला मंत्रालयात गेले होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं होतं त्यांना या वक्तव्यानंतर महिला आयोगानं नोटीस देखील बजावली होती आणि सोशल मीडियावर त्यांच्या या वक्तव्यावरुन टीकेची झोड उठवण्यात आली होती. 


ही बातमी देखील वाचा-


संभाजी भिडे यांना महिला आयोगाची नोटीस; महिला पत्रकाराला उद्देशून केलेल्या वक्तव्यावरुन होतेय टीका...