मुंबई : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे रविवारी निधन झाले. निधनानंतर दिवसही लोटला नाही तोच त्यांच्या स्मारकावरुन राजकारणाला सुरुवात झाली आहे. दादरच्या ज्या शिवाजी पार्कमध्ये लतादीदींवर अंत्यसंस्कार करण्यात आले तिथं लता मंगेशकर यांचं स्मारक बनवावं अशी मागणी भाजपचे आमदार राम कदम, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. तर राम कदमांच्या या मागणीला शिवसेना खासदार संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी यांनी प्रत्युत्तर दिलंय. तर शिवाजी पार्क हे शिवाजी पार्कच रहावं, त्याची स्मशानभूमी करु नये असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. त्यामुळे लतादीदींच्या स्मारकावरून सध्या राज्यात राजकारण सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.
लतादीदींचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक शिवाजी पार्कलाच व्हावं : काँग्रेस
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, लतादीदी यांचं स्मारक हे शिवाजी पार्कलाच व्हावं आणि चांगल्या दर्जाचं व्हावं, आंतरराष्ट्रीय दर्जाचा व्हावं. देशातून आणि जगातून येणाऱ्या लोकांना लतादीदींच्या स्मारकाला गेल्यानंतर लतादीदींचा गोड आवाज कालच्या, आजच्या आणि उद्याच्या पिढीला स्मरणात राहील. अशा दर्जाचे स्मारक शिवाजी पार्क मध्ये व्हावं हे काँग्रेसची भूमिका आहे.
शिवाजी पार्कवरच लतादीदींचं स्मृतीस्थळ बनवा; राम कदमांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
राम कदम यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, ज्या ठिकाणी लतादीदी पंचतत्वात विलीन झाल्या त्याच ठिकाणी त्यांचं स्मारक बनवावं. जनतेच्या या मागणीची तत्काळ पूर्तता करावी. हे स्थळ जगासाठी एक प्रेरणास्थळ ठरेल, असं राम कदमांनी म्हटलं आहे.
मागणीची गरज नाही, यावर राजकारण करू नका : संजय राऊत
शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले की, लता दीदींनी कधीही विसरता येणार नाही. काहींनी पार्कात स्मारक बनवण्याची मागणी केली आहे मात्र मागणीची गरज नाही, यावर राजकारण करू नका. लता दिदींच्या स्मारकाबाबत देशानं विचार करण्याची गरज आहे, असं ते म्हणाले.
खेळण्याची जागा सोडून बाजूला स्मारक असायला हरकत नाही, स्थानिक रहिवाशांचे मत
पण लतादीदींचं स्मारक शिवाजी पार्कमध्ये व्हावं का? या बाबत तेथील स्थानिक रहिवाशांना देखील प्रतिक्रिया दिली आहे. रहिवासी म्हणतात, स्मारक शिवाजी पार्क येथे व्हायला हरकत नाही मात्र ते एका बाजूला असायला हवं, खेळण्याची जागा सोडून बाजूला स्मारक असायला हरकत नाही. तर काही नागरिक म्हणतात, लतादीदींचं स्मारक पेडर रोडला हवं. जिथे त्यांचं वास्तव्य होतं त्या प्रभुकुंज मध्ये असायला हवं. ते सर्वांसाठी खुलं असायला हवं, त्यांची कारकीर्द त्यातून पाहायला मिळावी.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक शिवाजी पार्कमध्ये आहे. शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार केल्या गेलेल्या लता मंगेशकर या बाळासाहेबांनंतरच्या दुसऱ्या व्यक्ती आहेत. ज्या ठिकाणी बाळासाहेबांवर अंत्यसंस्कार करण्यात आले त्या ठिकाणापासून काही अंतरावर त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले होते. शिवाजी पार्क ही फक्त मोकळी जागा नाही. ही जागा अनेक घटनांची मूक साक्षीदार आहे. इतिहासाशी आपल्याला जोडणारा दुवा आहे. लतादीदींचं स्मारक कुठे आणि कसं व्हावं यावर येत्या काळात वाद देखील होण्याची शक्यता आहे. पण लतादीदींनी गाण्यांच्या रुपानं कोट्यवधी माणसांच्या मनात निर्माण झालेलं स्मारक कायम अजरामर राहणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Lata Mangeshkar passes away : युग संपले! लतादीदींच्या निधनानंतर संजय राऊत यांचे ट्वीट