नांदेड :  मुंबई उच्च न्यायालयात वकील असेलेले गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) हे मराठा आरक्षण, एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन यामुळे सर्वत्र सुपरिचित आहेत. तर त्यांच्या पत्नी व अॅड. जयश्री पाटील यादेखील माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या 100 कोटीच्या प्रकरणामुळे चांगल्याच चर्चेत आहेत. गुणरत्न सदावर्ते हे मुळचे नांदेडचे आहेत. सदावर्ते हे नांदेड शहरातील प्रभातनगर परिसरातील मूळ रहिवाशी आहेत. आज त्यांच्या घरी त्यांच्या एक वर्षीय मुलीचा नामकरण सोहळा  व सदावर्ते यांच्या वडिलांची पुण्यतिथी असे दोन्ही कौटुंबिक कार्यक्रम होते. परंतू, या कौटुंबीक कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एसटी कर्मचारी आले होते. त्यामुळे सदावर्तेंच्या या कौटुंबिक कार्यक्रमाला मेळाव्याचे स्वरूप आल्याचे पाहायला मिळाले.


आज अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या कौटुंबिक खासगी कार्यक्रमात एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांचा मेळावा असल्याची प्रचिती आली. कारण या खासगी कार्यक्रमासाठी सदावर्ते यांच्या नातेवाईकांपेक्षा एसटी कर्मचाऱ्यांचीचं मांदियाळी जास्त असल्याचे पाहायला मिळाले. तर दुसरीकडे या कार्यक्रमात एसटी विलीनीकरण झालेचं पाहिजे, एसटी आमच्या हक्काची अशा घोषणाबाजी देखील देण्यात आली. घोषणा आणि भाषणामुळे हा घरगुती कार्यक्रम नसून एसटी कामगारांचा मेळावाच आहे की काय अशीच प्रचिती उपस्थितींना आली असावी.


दरम्यान, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या या कार्यक्रमात नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, यवतमाळ जिल्ह्यातील जवळपास दहा ते पंधरा हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी उपस्थीती लावली होती. त्यामुळे सदर कार्यक्रम हा कौटुंबिक अथवा खासगी न राहता एसटी कर्मचाऱ्यांचा मेळावा असल्याचा भास होत होता. सध्या देशभरात ओमायक्रोनचे सावट आहे. राज्य व केंद्र सरकार याविषयी नागरिकांना गर्दी टाळा, त्रिसूत्री पाळा असे वारंवार सांगत आहे. मात्र. या कार्यक्रमात आलेल्या नागरिकांनी कुठेही सोशल डिस्टन्स तसेच मास्कचा वापर केलेला दिसला नाही. त्यामुळे कोरोना काळात या कार्यक्रमामुळे कोरोना नियमांची ऐसीतैसी झाल्याचे पाहायला मिळाले.


एक महिन्याहून अधिक काळ झालं राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण ही कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे. पगारवाढ व अन्य मागण्या मान्य झाल्यानंतरही कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. सरकार वारंवार आंदोलन मागे घेण्याचे आवाहन कर्मचाऱ्यांना करत आहे, मात्र कर्मचारी विलीणीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबत सदावर्ते हे  आक्रमकपणे एसटी कर्मचाऱ्यांची बाजू मांडत आहेत.


महत्त्वाच्या बातम्या :