सोलापूर : सोलापुरात कोरोना बाधितांची वाढणाऱ्या संख्येसाठी प्रशासन जबाबदर असून, त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे नियोजन नाही. लॉकडाऊन करुन श्रमिकांना बेरोजगार करणाचे हे षडयंत्र असल्याचा आरोप ज्येष्ठ कामगार नेते नरसय्या आडम यांनी केला. सोलापुरात कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी 16 जुलैच्या मध्यरात्री पासून 26 जुलैपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. यालाच माजी आमदार नरसय्या आडम यांनी विरोध केला आहे.


24 मार्चपासून सलग 72 दिवस लॉकडाऊन होता. या काळात पंतप्रधान नरेंद मोदी यांनी सांगितलं होतं की 18 दिवसात महाभारताचे युद्ध जिंकलं, 21 दिवसात कोरोनाचे युद्ध आपण जिंकल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचे वक्तव्य केले होते. केंद्र सरकारच्या समितीने देखील 16 मे पर्यंत कोरोना हद्दपार होईल, असा दावा केला होता. मात्र, वास्तविकता कोरोनाच्या चाचण्या नीट होत नाहीयेत. रुग्णांना व्यवस्थित उपचार मिळत नाहीयेत. सामान्य जनतेला सोबत घेऊन करण्याचे कोणतेही नियोजन नाहीये. असे असताना लॉकडाऊन शिवाय कोणताच पर्याय नाही, अशा प्रकारच्या वल्गना प्रशासकीय अधिकारी करत असल्याची टीका कॉम्रेड नरसय्या आडम यांनी केली.

तर सोलापुरातील श्रमिक कामगार रस्त्यावर उतरतील
सोलापूर शहरात विडी कामगार, यंत्रमाग कामगार, सफाई कर्मचारी, रिक्षा चालक यांच्यासारखे जवळपास 3 लाख श्रमिक आहेत. पूर्णपणे लॉकडाऊन करुन या सर्व श्रमिकांना पुन्हा एकदा बेरोजगार करण्याचा डाव प्रशासनाने आखला आहे. म्हणून राज्य सरकारने सोलापुरातील लॉकडाऊनचा निर्णय तात्काळ मागे घेण्याच्या सुचना द्याव्यात. तसेच प्रत्येक श्रमिकाला 10 हजार रुपये उदरनिर्वाह अनुदान द्यावे, अशी मागणी देखील माजी आमदार नरसय्या आडम यांनी यावेळी केली. जर लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय तात्काळ मागे घेतला नाही तर सोलापुरातील श्रमिक कामगार रस्त्यावर उतरतील, असा इशारा देखील नरसय्या आडम यांनी दिला.

सोलापुरात आज पहिल्यांदा शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात जास्त रुग्ण

शहरात 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन
सोलापुरात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्ण हे सोलापूर शहरात आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ही साखळी तोडण्यासाठी शहरात 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आला आहे. 16 जुलैच्या मध्यरात्रीपासून 26 जूलैपर्यंत लॉकडाऊन लागू असणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. सोलापूर शहर आणि शहरालगतच्या ज्या गावात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे, अशा गावातही लॉकडाऊन लागू करणार असल्याचे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले.

नागरिकांनी खरेदीसाठी बाजारात गर्दी करु नये
या लॉकडाऊनच्या काळात फक्त रुग्णालय, मेडिकल, दूध सुरु राहणार आहेत. या शिवाय पोलीस प्रशासनाचे दोन पेट्रोल पंप अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरु राहणार असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली. या शिवाय सर्व आस्थापना बंद राहणार असल्याची माहिती दिली आयुक्तांनी दिली. भाजीपाला, किराणा, इत्यादी अत्यावश्यक साहित्यांच्या खरेदीसाठी 5 दिवसांचा वेळ आहे. त्यामुळे नागरिकांनी खरेदीसाठी बाजारात गर्दी करु नये असे आवाहन पोलिस आयुक्त अंकूश शिंदे यांनी यावेळी केले.

Solapur Lockdown Extended | सोलापूरमधील लॉकडाऊनमध्ये वाढ, 26 जुलैपर्यंत सोलापुरात कडक लॉकडाऊन!