सांगली : क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या क्रांतिविरांगणा हौसाताई पाटील यांचे निधन झाले आहे. वयाच्या 96 व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. मागील काही दिवसांपासून त्याच्यावर कराड मधील कृष्णा चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर विटा जवळील हणमंतवडिये या  गावात शासकीय इतमामत  पार्थिवावर अंत्यविधी होणार आहे. क्रांतिविरांगणा हौसाताई पाटील यानी  देखील वडिलांप्रमाणेच स्वातंत्र्य आंदोलनात सहभाग घेत अभूतपूर्व कामगिरी केली होती.


स्वातंत्र्यानंतर वंचितांना न्याय देण्यासाठी त्या आयुष्यभर झटत राहिल्या. शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून हौसाताई पाटील काही काळ समाजकारण व राजकारणातही सहभाग घेतला. पुरोगामी चळवळीच्या आधारस्तंभ म्हणून  हौसाताई पाटील यांची ओळख होती. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सैनिक आणि स्वातंत्र्योत्तर काळातील राजकारणी, प्रतिसरकारची स्थापना करणारे स्वातंत्र्यसैनिक क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या म्हणून क्रांतीविरांगणा हौसाबाई पाटील  यांची ओळख होती.  हौसाबाई पाटील यांनी क्रांतिसिंहाच्या सोबत काही काळ स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला होता. सांगली जिल्ह्यातल्या हणमंतवडिये या गावी राहत होत्या.  


इंग्रजांविरोधातल्या लढ्यात हौसाताई आघाडीवर


हौसाताई पाटील यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावे आणि ब्रिटीशांचे जुलमी राज्य नष्ट व्हावे, यासाठी निर्भीडपणे लढा उभारला होता. पत्री सरकारला आवश्यक असणारा शस्त्रपुरवठा करण्याचं काम तरुण काळात हौसाताई करत असत. इंग्रजांविरोधातल्या लढ्यात पत्री सरकारमधील कार्यकर्त्यांनी विविध प्रकारची सोंग, भन्नाट कल्पना लढवून इंग्रजांना जेरीस आणलं होतं. इंग्रजांनी ठिकठिकाणी उभारलेले डाक बंगले जाळणं असो, रेल्वेचे रूळ उखाड्णं असो, फोनच्या तारा तोडणं असो वा इंग्रजांचा खजिना लुटणं असो, या सर्वच गोष्टीमध्ये हौसाताई आघाडीवर असायच्या. सुरलीच्या घाटात ब्रिटीशांच्या गाडीवरती छापा असो किंवा वांगी या ठिकाणचा ब्रिटिशांचा शस्त्रसाठा लुटण्यासाठी त्यांनी आपला जीव धोक्यात घातललेल्या घटना असो. भवानीनगर रेल्वे स्थानकावरती तर इंग्रजांचा शस्त्रसाठा लुटण्यासाठी वेषांतर करून हौसाताईंनी  योजना आखली आणि ती योजना त्यांनी यशस्वी करून दाखविली. गोवा स्वतंत्र व्हावा यासाठी त्या मांडवी नदी पार करून पणजी या ठिकाणी पोहोचल्या. छत्रपती संभाजीराजानंतर मांडवी नदी पार करण्याचे सामर्थ्य हौसाक्का पाटील यांच्यामध्ये होते.


हौसाताईंना देशभक्तीचे बाळकडू  घरातूनच


क्रांतीसिंह नाना पाटलांची एकुलती एका मुलगी असलेल्या हौसाबाई 3 वर्षांच्या असतानाच त्यांच्यावरील आईचं छत्र हरवलं. देशवसेवेचा वसा घेतलेल्या वडिलांचा सहवासही त्यांना पुरेशा प्रमाणात मिळाला नाही. स्वातंत्र्य लढ्यासाठी वडील भूमिगत राहत असल्यामुळे हौसाबाई अत्यंत खडतर परिस्थितीत जीवन जगावं लागलं. मात्र देशभक्तीचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळालं. पुढे प्रतिसरकारच्या कामात त्यांनी स्वत:ला झोकून दिलं. इंग्रजांच्या नजरा चुकवून भूमिगत अ‍सलेल्या कार्यकर्त्यांना निरोप पोहोचवणे, त्यांच्या जेवणाची व्यवस्था करणे, पत्रीसरकारला लागणाऱ्या हत्यारांची ने-आण करणे, अशी कामं त्यांनी केली.


स्वत: क्रांतीसिंह नाना पाटलांनी हुंडा, मानपान, मंडप, वाजंत्री, जेवण, कोणताही धार्मिक विधी न करता हौसाबाईंचे लग्न स्वातंत्र्य चळवळीतील कार्यकर्ते भगवानराव मोरे पाटील यांच्याशी लावून दिलं. एकमेकांना हार घालून गांधी पद्धतीनं त्यांनी हे लग्न लावून दिलं. ही प्रथा पुढे अनेक कार्यकर्त्यांनीही सुरू ठेवली.