अहमदनगर : संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील सर्व  तीनही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी हा निकाल दिला.

जितेंद्र शिंदे, नितीन भैलुमे आणि संतोष भवाळ या तिन्ही नराधमांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली.

सकाळी 11.23 वा न्यायाधीश कोर्टरुममध्ये दाखल झाल्या. त्यानंतर निकालाच्या वाचनाला सुरुवात झाली. अवघ्या सहा मिनिटांच्या आत तीनही दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

खून आणि बलात्काराच्या शिक्षेखाली तिघांनाही जन्मठेप आणि फाशीची शिक्षा झाल्याचं विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितलं.

कोणाला कोणती शिक्षा?

खून आणि बलात्काराचा कट  या अंतर्गत तिघांना फाशी

आरोपी 1 जितेंद्र शिंदे: विनयभंग केला म्हणून – तीन वर्षाची शिक्षा

आरोपी 1 जितेंद्र शिंदे : बलात्कार केला म्हणून - जन्मठेप आणि 20 हजार रुपयांचा दंड

आरोपी 2 संतोष भवाळ आणि आरोपी 3 नितीन भैलुमे :  बलात्काराचा कट आणि आरोपी 1 ला उद्युग्त करणे यासाठी जन्मठेप आणि 20 हजाराचा दंड

 आरोपी एक जितेंद्र शिंदे खून आणि बलात्कारासाठी फाशी

आरोपी 2 आणि 3 : बलात्कार आणि खूनाचा कट व आरोपी एकला उद्युग्त करणे यासाठी फाशीची शिक्षा

आरोपी 2 तर्फे सुनावणी तहकूब केली त्यासाठी खर्च वसूल करण्याचे आदेश दिले, तो त्याने न भरल्याने, जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल म्हणून 18 हजार वसूल करावा, जर दंड भरला नाही तर आरोपीला तीन महिन्यांची साधी शिक्षा. 

सगळ्या शिक्षा एकत्रित भोगायच्या आहेत, आरोपींना हायकोर्टात जाण्याचा अधिकार- 

मुख्य आरोपी जितेंद्र शिंदेला कोणकोणती शिक्षा?

-कलम 109 अंतर्गत तीन वर्षे सक्तमजुरी,
- कलम 376 (2) अंतर्गत जन्मठेप आणि 20 हजारांचा दंड.
- कलम 302 अंतर्गत फाशी

संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे यांना कोणकोणती शिक्षा?
- दोघांनाही 109 कलमाअंतर्गत जन्मठेप आणि 20 हजारांचा दंड
- संतोष भवाळला 309 अंतर्गत फाशी
- नितीन भैलुमेला 302 अंतर्गत फाशी

निर्भयाच्या आईची  प्रतिक्रिया

दरम्यान माझ्या छकुलीला न्याय मिळाला, पण आरोपींना फाशी मिळाली तरी  माझी छकुली परत येणार नाही, अशी उद्विग्न प्रतिक्रिया निर्भयाच्या आईने व्यक्त केली.

न्यायालयात काय झालं?

न्यायाधीश सुवर्णा केवले 11.23 मिनिटांनी  न्यायालयात आल्या. वेळी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या तिन्ही दोषींना कक्षात आणलं. तीनही आरोपींना कठड्यात उभं केलं, तिघांना नावं आणि आरोप वाचून दाखवण्यात आले.

मुख्य आरोपी जितेंद्र शिंदेने न्यायाधीशांकडे पाहून हात जोडले होते. ज्यावेळी त्याला दोषी धरण्यात आलं होतं, त्यावेळी त्याने शिक्षा एक दिवस काय आणि हजार दिवस असं म्हटलं होतं. मात्र आज तो न्यायालयात हात जोडून उभा होता.

न्यायाधीशांनी अवघ्या पाचच मिनिटात निकाल वाचून तीनही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली.

पीडितेची आई पहिल्या रांगेत

दरम्यान, निकालाच्या प्रतीक्षेत न्यायालय कक्षात तुफान गर्दी झाली होती. पीडितेची आई, बहीण आणि कोपर्डीचे नागरिक पहिल्या रांगेत बसले होते.

निकालाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाबाहेर कडेकोट पोलिस बंदोबस्त करण्यात आला होता. पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी स्वत:  सुरक्षेचा आढावा घेऊन बंदोबस्त केला होता.

तिघांनाही मृत्यूदंड द्या : उज्ज्वल निकम
अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात 21 नोव्हेंबर रोजी दोषी नंबर 1 जितेंद्र शिंदे आणि दोषी नंबर 3 नितीन भैलुमे यांच्या शिक्षेवर युक्तीवाद झाला होता. तर 22 नोव्हेंबर रोजी खटल्यातील दुसरा दोषी संतोष भवाळच्या शिक्षेवर युक्तीवाद झाला. मग विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी तिन्ही नराधमांना मृत्युदंडाची शिक्षा देण्याची उज्ज्वल निकम यांची मागणी केली होती. 22 नोव्हेंबरलाच शिक्षा जाहीर होण्याची शक्यता होती. परंतु 29 नोव्हेंबरला शिक्षेची सुनावणी होईल, असं न्यायालयाने स्पष्ट केलं.

कोपर्डीचा युक्तीवाद जसाच्या तसा : अॅड. उज्ज्वल निकम विरुद्ध तीन वकील

न्यायालयाबाहेर कडक पोलिस बंदोबस्त
कोपर्डी खटल्याचा निकाल ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक न्यायालयात आले. त्या पार्श्वभूमीवर न्यायालय परिसरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. निकालाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात तब्बल एक हजार पोलिस तैनात करण्यात आले. तसंच कर्जत आणि कोपर्डी गावात ही बंदोबस्त वाढवण्यात आला.

निकाल ऐकण्यासाठी लाऊडस्पीकरची व्यवस्था
नागरिकांना उभं राहण्यासाठी पार्किंगच्या एका बाजूला व्यवस्था करण्यात आली. त्याचबरोबर न्यायालयाच्या आवारातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची देखभाल दुरुस्ती केली. निकाल ऐकण्यासाठी लाऊडस्पीकरची ही व्यवस्था करण्यात आली . तर न्यायालय कक्षात खटल्याशी सबंधितांना प्रवेश देण्यात आला.

कोपर्डीत शुकशुकाट
कोपर्डी खटल्याच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर कोपर्डीत शुकशुकाट पसरला होता. गावकरी निकाल ऐकण्यासाठी अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालय परिसरात दाखल झाले.

तीनही आरोपी दोषी
दरम्यान, बलात्कार आणि हत्येप्रकरणी मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलूमे या तिघांवर कटकारस्थान करुन अत्याचार आणि हत्येचा दोष सिद्ध झाला आहे. कलम 120 ए, 376 (बलात्कारा) आणि 302 (हत्या) अशा कलमांन्वये लावलेले आरोप सिद्ध झाले आहेत.

काय आहे नेमकं प्रकरण?
अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डीमध्ये 13 जुलै 2016 रोजी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन निर्घृण तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाने राज्य ढवळून निघालं होतं. या प्रकरणी पोलिसांनी नितीन भैलुमे, जितेंद्र शिंदे आणि संतोष भवाळ या तिघांना अटक करण्यात आली होती. जलदगती न्यायालयात सुनावणी करुन आरोपींना फाशी देण्याची मागणी करण्यात आली.

कोपर्डी निकाल : दोषी जितेंद्र शिंदेच्या वकिलांना धमकी

31 जणांच्या साक्ष
कोपर्डी खटल्यात आतापर्यंत 31 जणांच्या साक्ष नोंदवण्यात आल्या. सप्टेंबर महिन्यात सर्व साक्षीदारांच्या साक्षी पूर्ण झाल्या आहेत. याप्रकरणी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे यांच्यावर कटकारस्थान करुन बलात्कार आणि हत्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

कोपर्डी बलात्कार आणि हत्येचा घटनाक्रम

13 जुलै 2016 –
रोजी सायंकाळी साडेसातच्या दरम्यान पीडितेवर अमानुष अत्याचार करुन हत्या

15 जुलै 2016 – 
जितेंद्र शिंदेला श्रीगोंद्यात अटक

16 जुलै 2016 –
संतोष भवाळला अटक

17 जुलै 2016 –
तिसरा आरोपी नितीन भैलुमे अटकेत

18 जुलै 2016 –
दोन आरोपींवर जिल्हा न्यायालय परिसरात हल्ला

24 जुलै 2016 –
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोपर्डीला भेट

7 ऑक्टोबर 2016 – 
तिन्ही आरोपींविरोधात जिल्हा न्यालयात दोषारोपपत्र दाखल

1 एप्रिल 2017 – 
कोपर्डी खटल्यातील तिन्ही आरोपींवर शिवबा संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून जिल्हा न्यायालयाच्या आवारात हल्ला

22 जून 2017 – 
खटल्यात सरकारी पक्षाने एकूण 31 साक्षीदार तपासले

2 जुलै 2017 –
कोपर्डीत सूर्योदय संस्थेच्यावतीने निर्भयाचं स्मारक बांधण्याच निर्णय

12 जुलै 2017 –
कोपर्डी घटनेच्या एक वर्षाच्या पूर्वसंध्येला नगरला कॅण्डल मार्च

13 जुलै 2017 –
घटनेला एक वर्ष पूर्ण झाल्याने निर्भयाला श्रद्धांजली अर्पण

9 ऑक्टोबर
खटल्याचा अंतिम युक्तिवाद पूर्ण

18 नोव्हेंबर 2017

तीनही आरोपी दोषी

21 नोव्हेंबर 2017

दोषी नंबर 1 जितेंद्र शिंदे आणि दोषी नंबर 3 नितीन भैलुमे यांच्या वकिलांचा शिक्षेवर युक्तीवाद, कमीत कमी शिक्षेची मागणी

22 नोव्हेंबर 2017

दोषी नंबर 2 – संतोष भवाळच्या वकिलांचा युक्तीवाद,

घटना दुर्देवी आहे, मात्र प्रत्येकाला बचावाचा, अधिकार आहे. त्यामुळे शिक्षेच्या सुनावणीवर कोणताही सामाजित दबाव नसावा, असा युक्तीवाद दोषीच्या वकिलांनी केला.

त्यानंतर सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी तीनही आरोपी प्रौढ आहेत, त्यामुळे त्यांना फाशीच द्यावी, अशी मागणी केली.

29 नोव्हेंबर 2017

तीनही आरोपींना फाशीची शिक्षा

संबंधित बातम्या :

फाशीची शिक्षा का? उज्ज्वल निकम यांनी कोर्टात दिलेली 13 कारणं!

कोपर्डीचा निकाल 29 नोव्हेंबरला, तीनही आरोपींना फाशीच हवी: उज्ज्वल निकम

कोपर्डी प्रकरण : दोषींच्या वकिलांचा कोर्टातील युक्तीवाद जसाच्या तसा

कोपर्डी निकाल : मला फाशी नको, जन्मठेप द्या: जितेंद्र शिंदे

खटल्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार कोणीही नव्हता, तरीही जिंकलो : निकम

कोपर्डी निकाल: आरोपींना जास्तीत जास्त काय शिक्षा होऊ शकते?

कोपर्डी बलात्कार-हत्या: तीनही आरोपी दोषी, 22 तारखेला शिक्षा

कोपर्डी निकाल: दोषींना कठड्यात उभं करुन न्यायाधीशांनी विचारलं….