रत्नागिरी : येवा कोकण आपलाच असा! हीच कोकणची संस्कृती आणि याच शब्दांमध्ये कोकणाने प्रत्येकाचे स्वागत केले. पण, कोरोनाच्या काळात मात्र सध्या कोकणातील चित्र काहीसे वेगळे दिसून येत आहे. ऐरवी वर्षाचे बाराही महिने गजबजलेले कोकण आज शांत आहे. चाकरमान्यांचा राबता देखील कोकणात नाही आहे. गणपती, शिमगा, दिवाळी किंवा गावांमध्ये होणारे ग्रामदेवतांचे उत्सव यामध्ये मुंबई, पुणे येथे स्थायिक असलेल्या चाकरमान्यांना अनन्य साधारण महत्व. गावच्या, वाडीच्या आणि समाजाच्या कोणत्याही निर्णयामध्ये चाकरमान्यांचा शब्द हा अंतिम! आज देखील कोकणातील अनेक घरे ही मुंबईहून येणाऱ्या मनिऑर्डरची किंवा ऑनलाईन पैसे ट्रान्सफरची वाट पाहत गावचा गाडा हाकतात. गावच्या शेती-वाडीला देखील चाकरमान्यांना मदतीचा हात आलाच. ऐरवी कायम या चाकरमान्यांच्या भोवती घुटमळणारी पावलं आणि रूंजी घालणारे गावकऱ्यांचे मन या चाकरमान्यांना गावी येण्यापासून रोखताना दिसत आहेत. कारण केवळ कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यास काय? सध्या गावची मंडळी खबरदारीचा उपाय म्हणून या साऱ्या गोष्टी करत असतील हे गृहित जरी धरले तरी मुंबई किंवा पुणे येथील परिस्थिती सर्वांना ठावूक आहे. त्यामुळे सध्या गाववाले आणि मुंबईकर यांच्यामध्ये गैरसमज झाल्याचे चित्र आहे. अनेक गावांना चाकरमान्यांना गावी येण्याकरता विरोध दर्शवल्याने वाद देखील झालेले दिसून येत आहेत. पण, अशा वेळी देखील कोकणातील काही गावांनी चाकरमान्यांचे स्वागत करत त्यांच्यामध्ये आपलेपणाची भावना रूजवत आम्ही तुमच्यासोबत आहोत हा विश्वास दिला आहे. अशाच एका गावांपैकी एक गाव म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील तेऱ्हे! सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे गाव आणि चाकरमान्यांच्या स्वागतासाठी त्यांनी राबवलेला पॅटर्न सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.
काय केले आहे गावाने?

कोरोनाचा मुंबई, पुण या ठिकाणचा वाढता प्रादुर्भाव हा मुंबईस्थित कोकणवाल्यांसाठी चिंता वाढवणारा. त्यानंतर मात्र हेच चाकरमानी गावाकडे येऊ लागले. चालत, पास काढून त्यांनी गाव जवळ करण्याचा निर्णय घेतला. पण, अनेक गावांमध्ये त्यांना विरोध झाला, पण, काही गावांनी त्याचे स्वागत केले. त्यासाठी गाव पातळीवर मॉडेल देखील तयार करण्यात आले. तेऱ्हे गावाने देखील याकरता पुढाकार घेत अगदी मे महिन्यापासून तशी तयारी केली. त्यासाठी गावचे सरपंच संदीप भुरवणे यांनी पुढाकार घेतला. ''गावात चाकरमान्यांना विरोध झाला असा नाही. पण, सरपंच म्हणून माझी जबाबदारी सांभाळली. गावच्या लोकांना मुंबई, पुणे येथील परिस्थिती काय आहे याची जाणीव करून दिली. लोकांमधील गैरसमज दूर केले. त्यानंतर गावात वस्तीपासून दूर तात्पुरती शेड उभारत लोकांची राहण्याची सोय करण्यात आली. यावेळी साऱ्या गोष्टी श्रमदानातून आणि प्रत्येकाने आपल्या खिशातील पैसे खर्च करत उभारल्या. इथे राहणाऱ्यांना कोणतीही कमी पडणार नाही याची काळजी घेतली गेली. पण, प्रशासनानं शेडमध्ये असणाऱ्या धोक्याबाबत कल्पना दिली आणि आमच्यापुढे नवा प्रश्न उभा राहिला. पण, त्यानंतर देखील आम्ही हार न मानता गावातील राहती घरे रिकामी केली. दक्षिणेकडील घरे मुंबईहून आलेल्या नागरिकांना तर उत्तरेकडील घरे गावच्या स्थायिकांना दिली. त्यामुळे सर्व गोष्टी मार्गी लागल्या. आज सर्वजण आनंदी आहे. मुंबईकरांना लागणारी प्रत्येक मदत केली जात आहे. अशी प्रतिक्रिया संदीर भुरवणे यांनी 'एबीपी माझा'कडे बोलताना दिली.

 

'रात्रीचा दिवस करत उभारली शेड'

गावात मोल-मजुरी करत राहणाऱ्यांची संख्याच जास्त आहे. यापैकी रविंद्र सुतार हा तरूण. शिक्षण केवळ तिसरी पास. पण, गावात चाकरमानी येणार म्हटल्यानंतर त्याने देखील पुढाकार घेतला. तसं पाहायाला गेले तर रविंद्रच्या घरातील कुणीही येणार नव्हतं. पण, त्यानंतर देखील त्याने शेड उभारणीमध्ये रात्रीचा दिवस केला. दिवसा मजुरी आणि रात्र शेड उभारणीचं काम त्याने आपल्या दोन साथीदारांसह केले. तिघांनी मिळून आपल्या खिशातील 15 हजार रूपये खर्च केले. पण, प्रशासनाने सांगितल्यामुळे साऱ्या मेहनतीवर पाणी फिरले. पण, त्यानंतर देखील 'आम्हाला काहीही वाटलं नाही. आमची लोकं सुरक्षित आणि सुखी राहावीत हीच आमची इच्छा होती. त्यासाठी हे सारे केले गेले. आम्ही प्रशासनाच्या निर्णयाचा आदर ठेवला. समाधान एकाच बाबीचे आहे, की त्यानंतर देखील मुंबईकर गावी आले आणि आमच्यासोबत राहत आहे. आम्ही सारी खबरदारी घेत असल्याची प्रतिक्रिया रविंद्रने 'एबीपी माझा'कडे बोलताना दिली.

मुंबईकरांमध्ये देखील समाधान

गावी आल्यानंतर मुंबईकरांनी देखील सारी खबरदारी घेतली आहे. त्यांनी राहत्या घराला समोरून टाळे लावले आहे. त्यांचा सारा व्यवहार हा मागील दाराने सुरू आहे. केवळ लहान मुलांनी स्थानिक गावच्या नागरिकांपासून दूर राहावे याकरता ही खबरदारी असल्याची मुंबईकराने 'एबीपी माझा'ला सांगितले. शिवाय, गावी आल्यामुळे भीती दूर झाली आहे. गावच्या लोकांकडून देखील चांगले सहकार्य आणि मदत होत आहे. आमची काहीही तक्रार नाही. आम्हाला कोणतीही वेगळी वागणूक मिळत नाही. केवळ खबरदारी म्हणून आम्ही 14 किंवा 28 दिवस क्वारंटाईन राहणार असल्याचे देखील या मुंबईकराने सांगितले.


माहेरवासिणींचे स्वागत

कोरोनाच्या काळात अनेक गावांनी मुंबईकरांना विरोध दर्शवला. तर काहींचा निर्णय झालेला नव्हता. अशा वेळी आपल्या सासरी निघालेल्या अनेकांपुढे आता काय करायचे हा प्रश्न उभा राहिला. त्यावेळी त्यांनी आपल्या माहेरी अर्थात तेऱ्हे गावात संपर्क साधला. या गावाने या मुलींचे देखील आपल्या जावयांसह स्वागत केले. त्यांना राहती घरे उपलब्ध करून देत त्यांची सारी सोय केली. सध्या आपल्याच लोकांना गाव घेत नसताना दिल्या घरी सुखी राहा म्हणत पाठवणी केलेल्या आपल्या लेकीला देखील या गावाने कठीण काळात आपले केले. सध्या गावात किमान 15 माहेरवासिणी राहत आहेत.