Konkan Railway In Monsoon:  मान्सूनसाठी कोकण रेल्वे सज्ज, पावसातही वाहतूक सुरू ठेवण्यासाठी अशी आहे उपाययोजना

Konkan Railway In Monsoon:  मान्सूनमध्ये रेल्वे सेवा सुरळीत ठेवण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने कंबर कसली असून उपाययोजना आखल्या आहेत.

Continues below advertisement

Konkan Railway In Monsoon:  कोकण भागात पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडतो. कोकण रेल्वेने (Konkan Railway) पावसाळ्यात वाहतूक सुरू ठेवण्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे. रेल्वे रुळावर पाणी साचू नये यासाठी नालेसफाई आणि संबंधित कामांवर भर दिला जात आहे. गेल्या काही वर्षांमध्ये रेल्वे मार्गावर मोठ्या प्रमाणात भू-सुरक्षा कार्ये राबविल्या गेल्याने दरड कोसळणे, माती वाहून जाण्यासारख्या घटनांमध्ये कमालीची घट झाली आहे. त्यामुळे गाड्या सुरक्षितपणे चालवल्या गेल्या आहेत. गेल्या 10 वर्षांत पावसाळ्यात कोकण रेल्वे सेवेत कोणताही मोठा व्यत्यय आला नसल्याचा दावा कोकण रेल्वेने केला आहे. 

Continues below advertisement

रेल्वे गाड्या सुरक्षितपणे चालवता याव्यात यासाठी कोकण रेल्वे  मार्गदर्शक तत्त्वांनुसार मान्सून पेट्रोलिंग करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. पावसाळ्यात कोकण रेल्वे मार्गावर सुमारे 673 जवान गस्त घालणार आहेत. असुरक्षित ठिकाणे ओळखून चोवीस तास गस्त घातली जाईल. त्याशिवाय, काही ठिकाणे खबरदारीचा भाग म्हणून 24 तास सुरक्षा रक्षक तैनात केला जाणार आहे. या ठिकाणी रेल्वेच्या वेगावर बंधने लागू असणार आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत मातीचा ढिगारा अथवा इतर कामासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार आहे. 

रेल्वेच्या वेगावर मर्यादा 

अतिवृष्टीच्या बाबतीत जेव्हा दृश्यमानता मर्यादित असते, तेव्हा लोको पायलटना ताशी 40 किमीच्या कमी वेगाने गाड्या चालवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सिग्नल दृश्यमानता सुधारण्यासाठी कोकण रेल्वेवरील सर्व मुख्य सिग्नल आता एलईडीने बदलले आहेत.

वैद्यकीय उपचाराची व्यवस्था

रत्नागिरी आणि वेर्णा येथे ऑपरेशन थिएटर आणि आपत्कालीन वैद्यकीय मदतीची व्यवस्था असलेली Accident Relief Medical Van असणार आहे.  वेर्णा येथे एआरटी (Accident Relief Train) ) देखील सज्ज ठेवण्यात आली आहे.

सर्व सुरक्षा श्रेणी कर्मचार्‍यांना आपत्कालीन परिस्थितीत नियंत्रण कार्यालय, स्थानकाशी संपर्क साधण्यासाठी मोबाईल फोन देण्यात आले आहेत. दोन्ही लोको पायलट आणि गार्ड्स ऑफ ट्रेन्सना वॉकी-टॉकी सेट प्रदान करण्यात आले आहेत. त्याशिवाय, तसेच कोकण रेल्वेवरील प्रत्येक स्थानकावर 25 वॅटचे VHF बेस स्टेशन आहे. हे ट्रेन क्रू तसेच ट्रेन क्रू आणि स्टेशन मास्टर यांच्यात वायरलेस संप्रेषण सक्षम करते. कोकण रेल्वे मार्गावर इमर्जन्सी कम्युनिकेशन (EMC) सॉकेट्स सरासरी 1 किमी अंतरावर प्रदान करण्यात आले आहेत. यामुळे पेट्रोलमन, वॉचमन, लोको पायलट, गार्ड आणि इतर फील्ड मेंटेनन्स कर्मचार्‍यांना कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत स्टेशन मास्तर आणि नियंत्रण कार्यालयाशी संपर्क साधण्यास मदत होते. 

पाऊस मोजण्यासाठी पर्जन्यमापक 

9 स्थानकांवर सेल्फ रेकॉर्डिंग पर्जन्यमापक बसवण्यात आले आहेत.  माणगाव, चिपळूण, रत्नागिरी, विलवडे, कणकवली, मडगाव, कारवार, भटकळ आणि उडुपी या प्रदेशातील पावसाची नोंद करतील. 3 ठिकाणी पुलांसाठी पूराचा इशारा देणारी यंत्रणा देण्यात आली आहे. काली नदी (माणगाव आणि वीर दरम्यान), सावित्री नदी (वीर आणि सापे वामणे दरम्यान), वाशिष्ठी नदी (चिपळूण आणि कामठे दरम्यान) आणि पाण्याचा प्रवाह धोक्याच्या पातळीपेक्षा जास्त झाल्यास अधिकाऱ्यांना सतर्कतेचा इशारा मिळेल. बेलापूर, रत्नागिरी आणि मडगाव येथील नियंत्रण कक्ष पावसाळ्यात गाड्या सुरक्षितपणे चालवण्यासाठी 24 तास कार्यरत असणार आहे.  

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola