रत्नागिरी : राजकारण म्हटल्यानंतर पदासाठी इच्छुकांची भाऊगर्दी दिसून येते. यातून अनेक वेळा कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याची भावना निर्माण होते. मग नाराजी आणि बंडाळीचं ग्रहण देखील पक्षाला लागतं. याला कोणताही राजकीय पक्ष अपवाद नाही. दरम्यान, हिच बाब टाळण्यासाठी रत्नागिरीतील शिवसेनेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आगामी पालिका निवडणुकीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवत हा निर्णय घेतला गेला आहे. या निर्णयानुसार रत्नागिरी नगरपालिकेसाठी शिवसेनेने एका घरात एकच पद देण्याचा निर्णय घेतला आहे. इच्छुकांची गर्दी आणि त्यातून नाराजीसह निर्माण होणारी बंडाळी टाळ्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यानं याची माहिती दिली आहे. त्यामुळे नगरपालिकेतील उमेदवारी असो किंवा पक्षातील इतर कोणतेही पद यासाठी आता एकाच घरातील दोन व्यक्तींना दावा किंवा तशी मागणी करता येणार नाही. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामध्ये रत्नागिरी नगरपालिकेचा देखील समावेश आहे. त्यामुळे सर्वांना न्याय देता येईल. निर्माण होणारी नाराजी, संभाव्य बंडाळीही टाळता येईल असा त्यामागील विचार आहे. सध्या शहरातील काही घरांमध्ये एकापेक्षा जास्त पदं दिसून येतात. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. 


निर्णयाचा किती फायदा होईल?
सध्या रत्नागिरी शहराचा विचार केल्यास काही प्रमुख नेत्यांच्या घरामध्ये एकापेक्षा जास्त पदं आहेत. शिवाय, आगामी पालिकेच्या निवडणुकीत एकाच घरातून एकापेक्षा जास्त जण दावा करतील अशी शक्यता आहे. संबंधितांकडून तशाप्रकारे तयारी केली जात आहे. त्यामुळे अनेक इच्छुक नाराज होतात. त्यातून मतांची विभागणी होण्याची शक्यता आहे. पण असं असलं तरी सध्या इच्छुक असलेल्या लोकांची त्यांच्या भागात ताकद दिसून येते. त्यामुळे एका घरात एकच पद या निर्णयाचा शिवसेनेला किती फायदा होतो? हे पाहावं लागेल. 


रत्नागिरीत शिवसेनेची ताकद किती?
रत्नागिरी कोकणातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा असा भाग आहे. सध्या या ठिकाणी शिवसेनेचं प्राबल्य दिसून येते. रत्नागिरी नगरपालिकेमध्ये शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक आहे. शिवसेनेचा आमदार देखील याच भागातील असून उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या मतदारसंघात रत्नागिरी शहराचा समावेश आहे. राजकी गणितं आणि कोकणातील काही ठिकाणांचा विचार केल्यास राजकीयदृष्ट्या रत्नागिरी शहराचं महत्त्व नक्कीच मोठं आहे. त्यामुळे रत्नागिरी पालिकेवर वर्चस्व असणे हे प्रत्येक राजकीय पक्षाला वाटणं स्वाभाविक आहे.