रत्नागिरी : कोकण! शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख. पण, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि 2024 मध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका पाहता आता प्रत्येक पक्ष हळूहळू तयारी करताना दिसून येत आहे. भाजपनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने देखील कोकणात लक्ष घालायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात त्यांचा हा संभाव्य सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा असेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी 'एबीपी माझा'ला याची माहिती दिली आहे. शिवाय, कुडाळ येथे शरद पवार कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याशी देखील संवाद साधणार असून या ठिकाणी मेळावा देखील आयोजित केला आहे. 


शरद पवार यांच्या दौऱ्याबाबत बोलताना अमित सामंत यांनी माहिती दिली की, "जूनमध्ये कोकणात पाऊस असतो. त्यामुळे वातावरण कसे असणार? हे प्रथमत: पाहिलं जाईल. शिवाय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा झाल्यास त्यावेळी असणार आचारसंहिता, सर्व नियम पाहून पवार साहेबांच्या दौऱ्याचं नियोजन केलं जाणार आहे." शरद पवारांच्या दौऱ्याच्या बातमीमुळे सध्या कार्यकर्त्यांमधील उत्साह मात्र दुणावलेला दिसत आहे. 


पवारांच्या दौऱ्याला महत्त्व का?
कोकणातील सारी परिस्थिती पाहिल्यास रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही आमदार किंवा खासदार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील पक्षाची ताकद नगण्य आहे. शिवाय, पक्षाला मरगळ आल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे. त्यामुळे पक्षवाढीसाठी आणि कार्यकर्त्यांना योग्य असा कार्यक्रम देण्यासाठी, कार्यकर्ते पदाधिकारी यांना आलेली मरगळ झटकण्यासाठी पवार यांचा दौरा महत्त्वपूर्ण असणार आहे. शिवाय, 2014 नंतर शरद पवार पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा करत आहेत. 


सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला. पण, सध्या नारायण राणे यांनी थेट शिवसेनेला आव्हान दिलं आहे. भाजपमध्ये गेलेले राणे सध्या पूर्ण ताकदनिशी शिवसेनेला अंगावर घेताना दिसत आहेत. शिवाय, शिवसेनेच्या ताब्यात असलेली जिल्हा बँक नारायण राणे अर्थात भाजपच्या ताब्यात गेल्यानंतर राणे अधिक आक्रमक झालेले दिसून येत आहेत. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीसोबत आहे. पण, पक्षवाढीसाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणण्यासाठी पवार यांचा दौरा महत्त्वाचा असणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचं अस्तित्व तुलनेनं नगण्य आहे. अशावेळी पवार यांचा दौरा पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी आणि पदाधिकाऱ्यांसाठी बुस्टर डोस ठरु शकतो. मागील काही दिवसांमध्ये राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यात दौरा केला होता. पण, पवार यांच्या दौऱ्याला साहजिकच महत्त्व असणार आहे.