Nanded Crime News : नांदेड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. गुन्हेगारांची मजल एवढी वाढलीय की चक्क एका आरोपीनं पोलिसांची पिस्तुल घेऊन पोलिसावरच गोळीबार केला आहे.  कुख्यात आरोपी बिगाणिया याचा साथीदार आणि बिगाणिया गॅंगचा सदस्य असणाऱ्या आरोपी दिलीप डाखोरे याने पोलीस अधिकाऱ्याचा शासकीय पिस्तुल हिसकावून त्याच पिस्तुलातून पोलिसांवर गोळीबार केल्याची घटना घडली. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी द्वारकदास चिखलीकर यांनी प्रत्युत्तरात आरोपीवर गोळीबार केल्याने आरोपी जखमी झाला आहे.


नांदेड येथील जवाहरनगर तुप्पा येथे एकावर गोळीबार करून तलवारीने हल्ला करून फरार असलेल्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक बुधवारी चार मे रात्री गस्तीवर होते. दरम्यान पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत त्याच्या मुसक्या आवळल्या. 


यावेळी फौजदाराच्या कमरेचे पिस्तुल काढून आरोपीने पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. त्या दरम्यान प्रत्युत्तरा दाखल स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी त्याच्यावर गोळीबार करून आरोपीस जखमी करून अटक केली आहे. दरम्यान गुन्हेगार व पोलिसातील हा गोळीबाराचा थरार नांदेड- लोहा रस्त्यावर परिसरात सुनेगाव शिवारात घडला आहे.


नांदेड जिल्ह्यात सध्या गुन्हेगारीचं प्रमाण चिंताजनक


नांदेड जिल्ह्यात सध्या गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्यातही हत्यांचं सत्र वाढलेलं दिसून येत आहे. उद्योजक संजय बियाणी यांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली होती. तर काही दिवसांपूर्वी एकाच दिवसात दोन हत्याच्या घटनेनं शहर हादरुन गेलं होतं. त्याआधी मिरवणुकीत एका युवकाची हत्या झाली होती. बियाणी यांच्या हत्येनंतर जिल्ह्यात गुंडाराज चालू असून बियाणी यांची निघृण हत्या म्हणजे बिहारलाही लाजवेल असे हत्याकांड नांदेडला घडले असून सध्या नांदेडमध्ये पोलीस गुंडा राज सुरू असल्याचं खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी म्हटलं होतं. 



इतर महत्त्वाच्या बातम्या: