रत्नागिरी : कोकण, गणेशोत्सव आणि चाकरमानी हा नातेसंबंध आता सर्वांनाच ठावूक आहे. पण, यंदा विघ्नहर्त्याचं आगमन होत असताना सावट आहे ते कोरोनाचं. गणेशोत्सवात चाकरमानी येणार म्हटल्यावर त्यांच्याकरता क्वारंटाईन कालावधी किती असावा? चाकरमान्यांनी किती दिवस अगोदर गावी यावं? चाकरमान्यांकरता असणारे नियम, आरती असो अथवा भजन या साऱ्यावर यंदा कोरोनाचं सावट दिसन येत आहे. परिणामी वाद, मतभेद आणि मतमतांतरे यांची देखील किनार यंदाच्या गणेशोत्सवावर दिसून येत आहे. अवघ्या 21 दिवसांवर गणपती बाप्पाचं आगमन आलेले असताना राज्यकर्त्यांकडून कोणताही निर्णय झालेला नाही. केवळ लवकरच निर्णय होईल या एका वाक्यावर वेळ मारून नेली जात असल्याचं चित्र सध्या तरी दिसून येत आहे. त्यामुळे कोकणी माणसामध्ये सध्या तरी संभ्रम दिसून येत आहे. कारण, गणेशोत्सवासाठी सरकार प्रशासन नियम आणि अटी घालताना दिसत असली तरी चाकरमान्यांच्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. शिवाय, या प्रश्नाचं आता राजकारण देखील सुरू झाले असून आरोप - प्रत्यारोपांना देखील ऊत आला आहे.


कोरोना, गणेशोत्सव आणि राजकारण
''चाकरमान्यांच्या बाबतीत निर्णय लवकर होणे गरजेचे आहे. चाकरमान्यांचा क्वारंटाईन कालावधी किती असावा? ई पासचा होणारा काळाबाजार आणि एसटीबाबत देखील कोणताही निर्णय झालेला नाही. दोन ते तीन लाख चाकरमानी या काळात कोकणात येत असतात. त्यांची स्वॅब टेस्टिंग होणे देखील गरजेचे आहे. चाकरमान्यांचा निर्णय अद्याप देखील झालेला नाही. आघाडी सरकार कोकणी जनतेच्या भावनांशी खेळतंय. कोकणी जनतेला फसवण्याचं काम सरकार करत असल्याचा आरोप भाजपचे उपाध्यक्ष आणि कोकण प्रभारी प्रसाद लाड यांनी केला. तर, त्याला उत्तर म्हणून ''विरोधी पक्षाची मंडळी चाकरमानी आणि गावची मंडळी यांच्यात भांडणं लावण्याचा काम करत आहेत. मागील काही दिवसात लोकल स्प्रेड होत आहे. त्यामुळे चाकरमान्यांची काळजी घेणे देखील महत्त्वाची आहे. केवळ भावनेच्या आहारी जात निर्णय होता कामा नये. सारी गोष्ट पाहता याबाबत गांभीर्यानं निर्णय होणे गरजेचे आहे. चाकरमानी येताना कोरोना घेऊन येतात असं भाजपचे नेते नारायण राणे यांनी म्हटलं होतं. एका बाजुला चाकरमान्यांनी निर्भत्सना करायची आणि दुसरीकडे या प्रश्नाच्या मुद्द्यावर आंदोलन करायचं ही भूमिका दुटप्पी आहे. चाकरमानी आणि स्थानिकांचं आरोग्य महत्त्वाचं आहे. उत्सव येत राहतील पण, माणूस जगला पाहिजे, क्वारंटाईन कालावधी हा आयसीएमआरच्या निर्देशाप्रमाणे निश्चित करावा लागेल. क्वारंटाईन कालावधी या मुद्यावर आम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलत आहोत. पण, लवकर स्प्रेड पाहता कोणताही निर्णय घिसारघाईनं होता कामा नये'' अशी प्रतिक्रिया शिवसेना सचिव आणि रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदार संघाचे खासदार विनायक राऊत यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना दिली आहे.

स्थानिक पत्रकारांचं म्हणणं काय?
या साऱ्या परिस्थितीबाबत लोकसत्ताचे ज्येष्ठ पत्रकार सतीश कामत यांना विचारले असता त्यांनी ''या मुद्यावर नक्कीच राजकारण सुरू झाले आहे. कोकणातील चाकरमानी ही एक मोठी मतपेढी आहे. ती मतपेढी, कार्यकर्ते उपयोगी पडत असते. सारी परिस्थिती पाहता भाजपकडून याचं मोठ्या प्रमाणात राजकारण करू पाहत आहे. सध्याची परिस्थिती पाहता गावा पातळीवरचा हा वाद पुढे वाढू शकतो. मे महिन्यात देखील असंच चित्र होतं. पण, त्यावर वेळीच सामंजस्यानं निर्णय घेतला गेला. चाकरमानी आणि गाव हे वेगळं नातं आहे. सध्याची परिस्थिती काही असली तरी राजकारण्यांना यातून सुटका नाही. त्यांना याबाबत निर्णय घ्यावा लागेल. रत्नागिरी जिल्ह्याचा विचार करता ग्रामपंचायती,पंचायत समितीवर शिवसेनेचं, तर काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचं प्राबल्य आहे. त्यामुळे स्थानिक राजकारणी यातून सुटू शकत नाहीत. राज्यपातळीवरचे नेत्यांची एकवेळ सुटका होईल. सामोपचारानं यावर निर्णय घ्यावा लागेल. मे महिन्यात टप्प्याटप्प्यानं चाकरमानी गावी आले. पण, गणेशोत्सवात चाकरमानी एकाच वळी येणार आहेत. खर्च आणि ताण पाहता याबाबतचा निर्णय राज्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांना नक्कीच घ्यावा लागणार आहे.''

याच मुद्यावर दैनिक सकाळचे निवासी संपादक शिरिष दामले यांनी ''14 दिवस क्वारंटाईन हा निर्णय वैद्यकीय क्षेत्राचा आहे. आपल्याकडे असलेल्या राजकारण्यांना याबाबत ज्ञान नाही. शिवाय, काही प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे ज्यांना वैद्यकीय ज्ञान नाही त्यांच्याकडे नको तेवढी ताकद दिलेली आहे. याचा निर्णय हा वैद्यकशास्त्राप्रमाणेच घेतला गेला पाहिजे. या मुद्याकडे राजकारण्यांपुढील पेच असं न पाहता कामा नये. याबाबतची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. मला हा राजकारणाचा मुद्दा वाटत नाही. क्वारंटाईन कालावधी कमी करण्याचं स्थानिक राजकारणी म्हणतात पण मग आयसीएमआरनं क्वारंटाईन कालावधी 28 दिवस सांगितल्यास राजकारणी काय करतील? गणपतीसाठी तुम्ही येऊ नका. न आल्यास जग बुडत नाही असं नेते मंडळी का सांगू शकत नाहीत? नेत्यांनी लोकांच्या मागून धावायचं की त्यांचं प्रबोधन करायचं?'' असा सवाल त्यांनी केला.

सद्यस्थितीवर डॉक्टरांचं म्हणणं काय?
याबाबत आम्ही रत्नागिरीतील डॉक्टर आणि IMAचे रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष निनाद नाफडे यांनी ''क्वारंटाईन कालावधी कोणत्याही कारणास्तव कमी करता येणार नाही. ही बाब ध्यानात घेणे गरजेचे आहे. सध्या कोकणातील वैद्यकीय परिस्थिती मुंबई, पुणे सारखी सक्षम नाही. उद्या बाहेरून येणारे लोंढे वाढल्यास त्याचा ताण हा आरोग्य व्यवस्थेवर येणार आहे. त्यामुळे येणारी संख्या कमी असल्यास त्याचा फायदा निश्चित होईल'' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. डॉ. निनाद नाफडे हे कोविड जिल्हा समन्वयक देखील आहेत.

तर, लॉकडाऊनमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक लाख पन्नास हजार लोकं बाहेरच्या जिल्ह्यातून आली. आयसीएमआर या केंद्रीय वैद्यकीय संस्थांनी दिलेल्या नियमावलीनुसार जिल्ह्यातील सर्वच सरपंचांनी 14 दिवस क्वारंटाईन कालावधील केलेला आहे. लोकांच्या सुरक्षिततेसाठी 7 ऑगस्टपर्यंत चाकरमान्यांना जिल्ह्यात प्रवेश दिला जावा असं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं आहे. एखाद्या गावात कोरोना रूग्ण आढळून आल्यास त्या ठिकाणी कन्टेनमेंन्ट झोन केला जातो. गणेशोत्सवात अशी परिस्थिती निर्माण झाल्यास समस्या उद्भवू शकते. शिवाय आम्ही भजनं देखील गावातच करण्याचा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सरपंच संंघटनेचे अध्यक्ष तुकाराम उर्फ दादा साईल यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना दिली.

कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह देखील दिसून येत आहे. टप्प्याटप्यानं चाकरमानी कोकणातील मूळगावी येत आहे. मूर्तीशाळांमध्ये देखील कामाची लगबग दिसून येत आहे. दरम्यान, यंदा योग्य ती खबरदारी घेत गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय कोकणवासियांनी घेतला आहे.