What Is Kandka : कोल्हापूर म्हणजे विषयच हार्ड... तिथली रांगडी लोकं आणि त्यांची रांगडी भाषा म्हणजे एकदम नाद खुळा. कोल्हापूरचे राजकारण्यांची भाषाही रांगडी, म्हणजे खटक्यावर बोट अन् जाग्यावर पलटी. आता राजाराम कारखान्याच्या (Rajaram Sakhar Karkhana ) निमित्ताने कोल्हापुरात पुन्हा एकदा राजकीय धुरळा उडाला आणि एकमेकांचा कंडका पाडण्याची भाषा झाली. एकेकाळचे राजकीय मित्र असलेले बंटी उर्फ सतेज पाटील (Satej Patil) आणि मुन्ना उर्फ धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) या निमित्ताने एकमेकांसमोर आले. दोन्ही गटाकडून एकमेकांचा कंडका पाडायची भाषा झाली. निवडणुकीचा निकाल आला आणि सतेज पाटलांचाच कंडका पडल्याचं दिसून आलं. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीवेळी 'आमचं ठरलंय' नंतर आता राजाराम कारखान्याच्या निमित्ताने 'कंडका पाडायचा' हा शब्द फेमस झाल्याचं दिसून आलं.
रांगड्या कोल्हापूरने अनेक शब्द दिले आहेत. लई भारी, काटा किर्रर्र, खटक्यावर बोट जाग्यावर पलटी, नाद खुळा, बाजार उठवला, नाद नाही करायचा, आबा घुमीव अशा बऱ्याच कोल्हापुरी शब्दांचा वापर सगळीकडे सर्रासपणे केला जातोय. कोल्हापूरच्या प्रत्येक निवडणुकीत असे काही भन्नाट शब्द समोर येतात आणि त्याचं स्लोगन तयार होतं. गेल्या निवडणुकीत 'आमचं ठरलंय' हा शब्द आला आणि आता राज्यभर त्याचा वापर केला गेला. त्यानंतर राजाराम कारखान्याच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत सतेज पाटलांनी महाडिकांचा कंडका पाडण्याची भाषा केली. आप्पा महाडिकांनी पुन्हा एकदा जादू दाखवली आणि कारखाना राखला, पण या निमित्ताने 'कंडका' हा शब्द मात्र फेमस झाला.
Kolhapur Sugar Cane Belt : उसाच्या पट्ट्यात वापरला जातोय हा शब्द
कंडका हा शब्द उसाच्या पट्ट्यात वापरला जातोय. उस तोडणीवेळी त्याचे लहान लहान तुकडे केले जातात, म्हणजे त्याच्या कांड्या केल्या जातात. त्यावेळी त्याचा कंडका केला जातो असं म्हटलं जातं. पण उसासाठी वापरण्यात येणारा हा शब्द कोल्हापुरी भाषेत इतरत्रही वापरण्यात येतोय. म्हणजे दोन मित्राचं काही ठरलं असलं, तर 'चल रे एकदा काय तो कंडका पाडू' असं म्हटलं जातं. म्हणजे त्याचा विषय संपवू असा त्याचा अर्थ घेतला जातो.
भाऊबंदकीमध्ये वाद सुरू असल्यास 'काय तो एकदाचा कंडका पाडा' असं म्हटलं जातं. नाहीतर मारामारीच्या घटना घडल्या तर त्याचा 'एकदाचा कंडका पाडू' म्हटलं जातं. इथं कंडका पाडू म्हणजे एक घाव दोन तुकडे करणे होय.
कोल्हापुरात तांबड्या-पांढऱ्या रस्स्याची नाहीतर खुळ्या रस्स्याची पार्टी होत असताना, किंवा कोणाकडे त्याची पार्टी लागल्यास 'काय रे त्यो एकदाचा कंडका पाड आणि लाव जुळणी' असं म्हटलं जातं. म्हणजे दे एकदाची पार्टी बाबा असा अर्थ होतोय. थोडक्यात काय तर कंडका पाडणे या एकाच शब्दाचे परिस्थितीनुसार अनेक वेगवेगळे अर्थ होतात.
राजकारणात कंडका पाडणं म्हणजे काय?
कोल्हापूरच्या आणि पश्चिम महाराष्ट्राच्या स्थानिक राजकारणात कंडका पाडायचा हा शब्द सर्रास वापरला जातोय. आता सतेज पाटलांनी राजारामचा यंदा कंडका पाडायचाच या इर्षेने रान उठवलं. पण निवडणुकीच्या निकालानंतर आता त्यांचाच कंडका पडल्याचं महाडिकांनी सांगितलं. तर राजकारणात कंडका पाडणं म्हणजे राजकारणातून एखाद्याला संपवणं हा अर्थ होतोय.
आता कोल्हापुराच्या राजकारणात हा शब्द वापरल्यानंतर तो राज्यभर होणारच. मग कारखान्याच्या निवडणुकीनंतर आता विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीत कुणी कुणाचा कंडका पाडतंय ते पाहावं लागेल.