kolhapur Jaggery : जोपर्यंत गुळाला 3700 रुपयांपेक्षा जास्त भाव मिळत नाही तोपर्यंत गुळ सौदे सुरू न करण्यावर गुळ उत्पादक शेतकरी ठाम आहेत. प्रशासक प्रकाश जगताप यांनी शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी धक्कादायक माहिती गुळ उत्पादक शेतकऱ्यांनी समोर आणत भांडाफोड केली. कर्नाटकात तयार झालेला गुळ हा कोल्हापूरचा गुळ म्हणून मोठ्या प्रमाणावर विक्रीला येत असल्याचे समोर आणले. कर्नाटकच्या गुळाची पोलखोल ही शेतकऱ्यांनी प्रशासकांसमोर केली. ही बाब गंभीर असून यावर कायदेशीरित्या कारवाई करण्याची मागणी गुळ उत्पादक शेतकऱ्यांनी प्रशासकांच्याकडे केली. प्रशासकांनी आपण आपल्या सर्वाधिकरांचा वापर करून या ठिकाणी कारवाई करू असा आश्वासन शेतकऱ्यांना दिले.
गेल्या महिनाभरापासून गुळाचे दर घसरत चालल्याने कोल्हापूरमध्ये गुऱ्हाळघरे (Kolhapuri jaggery in crisis) अखेरची घटका मोजू लागली आहेत. गुळाला किमान हमीभाव मिळावा आणि व्यापाऱ्यांकडून होत असलेली पिळवणूक बंद व्हावी यासाठी आज मार्केट यार्डमध्ये शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत गुळ सौदे बंद पाडले. गुळाचे दर वाढणार नाही तोपर्यंत गुळ सौदे चालू करू देणार नाही, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. कोल्हापूरच्या नावाखाली कर्नाटकच्या गुळाची होत असलेली विक्रीही यावेळी शेतकऱ्यांनी दाखवून दिली. त्यामुळे कोल्हापूरच्या गुळाच्या नावावर फसवणूक होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.
यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी गुळाला हमीभाव मिळालाच पाहिजे, अशी मागणी एकमुखाने मागणी केली. गुळाचा दर घसरून 3 हजारांवर आला आहे. किमान 3700 रुपये दर मिळावा, जेणेकरून उत्पादन खर्च निघेल, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. एका शेतकऱ्याने व्यथा व्यक्त करतानाना सांगितले की, कधीकाळी कोल्हापूर जिल्ह्यात सुरु असणारी1200 गुऱ्हाळघरे 300 वर आली. त्यानंतर 180 वर येऊन पोहोचली. आता केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतपत 60 ते 65 गुऱ्हाळघरे आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून दर पडला आहे. साखर कारखान्यांकडून उसाला प्रतिटन सरासरी 3 हजार रुपयांवर दर मिळत असताना गूळ मात्र कवडीमोलाने विकला जात आहे.
कोल्हापूरच्या नावाखाली कर्नाटकातील गुळाची विक्री
कर्नाटकमध्ये गुळाचा उत्पादन खर्च कमी असल्याने तो गूळ कोल्हापूरच्या मार्केट यार्डात कोल्हापुरी गुळाच्या नावाचे पॅकिंग करून विकला जात आहे. त्यामुळे त्याची पाहणी आज अधिकाऱ्यांकडून करण्यात आली. त्यामुळे ही सुद्धा शेतकऱ्यांची फसवणूक आहे. कर्नाटकमध्ये 3 हजार ते 3100 रुपयांपर्यंत तयार केला जातो. त्यानंतर हाच गूळ कोल्हापूरचे लेबल आणि पॅकेजिंग करून कोल्हापूरच्या नावाने गुजरातसह बाहरेच्या राज्यांमध्ये विकला जातो. त्यामुळे कोल्हापूरच्या शेतकऱ्यांची आणि ग्राहकांची फसवणूक होत असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला.
गुळाचे उत्पादन कमी करण्याचा निर्णय
कोल्हापूर जिल्ह्यातील गुळ उत्पादक दर घसरल्याने चांगलाच हवालदिल झाला आहे. गूळ उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसत असल्याने सोमवारी गुऱ्हाळ घरे बंद करण्याऐवजी गुळाचे उत्पादन कमी करण्याचा निर्णय गूळ उत्पादक शेतकऱ्यांनी घेतला आहे. कोल्हापूरचा गूळ हा दर्जेदार आणि साखरमिश्रित नसावा, असाही निर्णय घेण्यात आला. बाजार समितीत शेतकऱ्यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
इतर महत्वाच्या बातम्या