Kolhapur District Gram Panchayat Election : तालुका असून अजूनही ग्रामपंचायत असल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी (Radhanagari) आणि शाहुवाडी (Shahuwadi) या दोन तालुक्यांनी मतदानावर बहिष्काराचा निर्णय घेतला आहे. दोन्ही तालुक्यांनी नगरपंचायत दर्जा मिळावा यासाठी ग्रामपंचायत मतदानावर बहिष्काराचा निर्णय घेतला आहे.


राधानगरीत नगरपंचायतच्या मागणीसाठी सर्वपक्षीयांनी सोमवारी बंद पाळत पाठिंबा दिला. नगरपंचायत होण्यासाठी निकराची लढाई करण्याचा निर्धार सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत निवडणुकीवर सर्वानुमते बहिष्कार टाकण्याचा निर्धार झाला. यानंतर तहसीलदार मीना निंबाळकर यांना निवेदन देण्यात आले. होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत कोणीही निवडणूक अर्ज भरायचा नाही असाही निर्धार करण्यात आला. 


राधानगरीला नगरपंचायत व्हावी, ही गेल्या कित्येक महिन्यांपासूनची मागणी आहे. मात्र या ना त्या कारणावरून रेंगाळलेला हा प्रश्न ग्रामस्थांनी संभाव्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच उचलून धरला आहे. शहरातील व्यापारी संघटनांनी आपले सर्व व्यवहार बंद ठेऊन बंदला पाठिंबा दिला.


शाहुवाडीमध्येही नगरपंचायतच्या मागणीसाठी एल्गार 


राधानगरीतनगरपंचायतसाठी सर्वपक्षीय एल्गार सुरु असतानाच शाहुवाडीमध्येही आता नगरपंचायत मागणीसाठी उचल खाल्ली आहे. गावात नगरपंचायत व्हावी या मागणीसाठी शाहूवाडी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. कोणीही उमेदवारी अर्ज दाखल करायचा नाही, अशी भूमिका घेतली आहे. राज्य सरकारकडून तालुका ठिकाणच्या गावांना नगरपंचायत देण्याचा निर्णय आठ वर्षांपूर्वी घेतला होता. त्या निर्णयाने शाहूवाडी गावाला नगरपंचायत मंजूर असूनही कार्यवाही झालेली नाही. ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाल्याने ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. 


प्रभाग रचना आणि आरक्षण कार्यक्रमावर यापूर्वीच बाहिष्कार टाकण्यात आला आहे. आता उमेदवारी अर्ज दाखल करायचा नाही आणि मतदानही करायचे नाही. सर्व निवडणूक कार्यक्रमावर बाहिष्कार टाकायचा निर्णय सर्वांनी घेतला आहे. नगरपंचायत झाली तरच येथील पाणी, रस्ते यांसह सर्वच विकासकामांना गती मिळेल, विकास होईल त्यासाठी नगरपंचायत झालीच पाहिजे असा सर्वांचा सूर आहे. 


दरम्यान, जिल्ह्यातील 475 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. जिल्ह्यातील 12 तालुक्यांत मुदत संपलेल्या गावांमध्ये निवडणुका होत असून तहसीलदारांकडून निवडणूक नोटीस प्रसिद्ध झाली आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमुळे गावागावांतील वातावरण तापले आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान अर्ज दाखल केले जातील. 5 डिसेंबरला अर्ज छाननी होईल. 7 डिसेंबरला चिन्ह वाटप व उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होईल. 18 डिसेंबरला मतदान व 20 डिंसेबरला मतमोजणी होणार आहे.


इतर महत्वाच्या बातम्या