Kolhapur News : कोल्हापूरमध्ये ठाकरे गटाच्या शहर शिवसेनेकडून रस्त्यांच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये रांगोळ्या आणि दिव्यांची रोषणाई करण्यात आली. आरटीओ कार्यालय रोड, बिनखांबी गणेश मंदिर रस्ता, मंडलिक गल्ली, विक्रम नगर मुख्य रोड, पद्मा टॉकीज परिसर आदी ठिकाणी शिवसेनेकडून हे अनोखे आंदोलन करण्यात आले. या भागात खड्डेच खड्डे पडले असून ते रांगोळ्यांनी सजवण्यात आल्यानंतर दिवे लावण्यात आले. 


शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले की, पालिकेचे अधिकारी दहा, वीस टक्क्यांमध्ये अडकले आहेत. शहरातील खड्यांमुळे नागरिक त्रस्त असताना वेळकाढूपणा सुरु आहे. अधिकाऱ्यांनी याकडे तातडी लक्ष देऊन समस्या तातडीने न सोडवल्यास आंदोलन करू, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.


तुळशी विवाह दिनी कोल्हापूर शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत नाराजी व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम करण्यात आल्याचे  शिवसैनिकांनी सांगितले. दरम्यान, शहरात तुळशीविवाह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बाजारात शनिवारी झेंडूची फुले व पुजेसाठी लागणाऱ्या ऊसाचे भाव वाढले होते. झेंडूच्या फुलांचा भाव 150 ते 160 रुपये प्रतिकिलो, तर 5 उसांसाठी 70 ते 100 रुपये दर होता. 


कोल्हापूर शहरातील खड्ड्यांमुळे सर्वजण त्रस्त आहेत. महापालिकेच्या आंधळ दळतंय आणि कुत्र पीठ खातंय या  कारभारामने कोल्हापूरची पुरती नाचक्की झाली आहे. महापालिकेचे अधिकारी टक्केवारीचे अर्थकारण काढून शहराची प्रतिमा मलिन करत आहेत, असा आरोप करत रांगोळी काढून आंदोलन करण्यात आले. तुलसी विवाहपूर्वी खड्ड्यांभोवती रांगोळी काढून दिवे लावून मनपा अधिकाऱ्यांची याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. 


'जणाची नाहीतर मनाची तरी लाज ठेवा'


दुसरीकडे, खड्ड्यात गेलेल्या कोल्हापूर शहरातील रस्त्यांवरून चौफेर टीका सुरु झाल्यानंतर कोल्हापूर मनपा प्रशासनाकडून पॅचवर्कचे काम सुरु करण्यात आले आहे. मात्र, भंगार पद्धतीने करण्यात येत असलेल्या पॅचवर्कमुळे पुन्हा एकदा संतापाची लाट उसळली आहे. दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर शहरातील आपटेनगर परिसरात ज्येष्ठ नागरिकांनी पालिका अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरताना कानउघडणी केली. 'जणाची नाहीतर मनाची तरी लाज ठेवा' अशा शब्दात सिनिअर सिटीझनकडून अधिकाऱ्यांना फैलावर घेण्यात आले. त्यामुळे अधिकाऱ्यांचा चेहरा पडलेल्या खड्ड्यापेक्षा अधिक पडलेला दिसून आला. 


इतर महत्वाच्या बातम्या