ShahajiBapu Patil : आमच्यावर '50 खोके एकदम ओके' अशी टीका होत असली, तरी आम्ही या टीकेला जास्त महत्व देत नाही. महाविकास आघाडीचा आम्ही  खोक्याविना ओके कार्यक्रम केला, असा टोला शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी लगावला आहे. ते आज कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाडमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. 


शहाजीबापू बोलताना म्हणाले, अडीच वर्षांपूर्वी आम्ही भाजपशी युती करून निवडून आलो, पण देवेंद्र फडणवीसांना धोका देत राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडी करण्याचे पाप केले, पण  आम्ही फडणवीस यांच्याबरोबर युती करत आम्ही खोक्याविना महाविकास आघाडीचा ओके कार्यक्रम केला. उद्धव ठाकरे यांच्याकडून 50 खोके, एकदम ओके अशी टीका होत असली, तरी आम्ही फार महत्त्व देत  नाही. 


उद्धव ठाकरे शरद पवारांपेक्षा वेगळे बोलत नाहीत 


आमदार शहाजीबापू पुढे म्हणाले की, युती सरकार 1995 मध्ये असतानाही शरद पवारही महिन्याला सरकार पडणार असे म्हणत असतानाही पाच वर्ष पूर्ण केली. आता उद्धव ठाकरेही त्याच पावलावर पाऊल टाकून शिंदे फडणवीस सरकार पडणार अशी वक्तव्ये करत आहेत. ते पवारांपेक्षा वेगळे बोलत नाहीत. शिंदे सरकार बळीराजाचे हित जोपासणारे आहे. परतीच्या पावसाने झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याचा प्रयत्न करत आहे. प्रोत्साहानपर अनुदानही लवकरच देणार आहोत, असेही ते म्हणाले. 


काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?


उद्धव ठाकरे यांनी संपर्कप्रमुखांच्या बैठकीत राज्यामध्ये मध्यावधी निवडणुकांची शक्यता वर्तवली होती. उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्ते आणि नेत्यांना निडवणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेशही या बैठकीत दिले. उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यानंतर राजकीय चर्चेला उधाण आले आहे. दुसरीकडे आमदार फुटू नये म्हणून उद्धव ठाकरे यांनी मध्यावधी निवडणुकीचं वक्तव्य केल्याचे मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी एबीपी माझाच्या कट्ट्यावर केले. 


दादर येथील शिवसेना भवनात राज्यातील सर्व संपर्कप्रमुखांच्या बैठक पार पडली. तयारीला लागा, मध्यावधी निवडणुका कधीही लागू शकतात,कार्यकर्त्यांपर्यंत जा, राज्यामध्ये राजकीय परिस्थिती अस्थिर झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही मोठ मोठ्या घोषणा करायला सुरुवात केली आहे. राज्यात कधीही मध्यावधी निवडणुका लागतील. आपल्याला प्रत्येकाच्या घराघरात पोहचला हवं. आपला मुख्यमंत्री असताना केलेले काम घराघरात पोहचवा. राज्यात मध्यवधी निवडणुका लागतील, त्याला तयार राहा, अशी सूचना उद्धव ठाकरे यांनी विधानसभा संपर्कप्रमुखांना दिल्या आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या