कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या अर्थात गोकुळच्या करवीर तालुका संपर्क मेळाव्यात प्रचंड गोंधळ झाला. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान हाणामारी झाली. दूध संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्याविषयी आक्षेपार्ह टिप्पणी करणारे राजाराम कारखान्याचे माजी अध्यक्ष विश्वास नेजदार यांना मारहाण करण्यात आली. त्यातच एकाने नेजदार यांना खुर्ची फेकून मारली. काहींनी नेजदार यांना बाजूला नेल्याने पुढील अनर्थ टळला.
'गोकुळ' मल्टिस्टेट करण्याचा ठराव इंग्रजीत का छापला, असा जाब विश्वास नेजदार यांनी केला. यावेळी नेजदार यांनी विश्वास पाटील यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पणी केल्याने काहींनी त्यांच्यावर खुर्ची भिरकावली.
दुसरीकडे, वार्षिक सभेच्या अपुर्या जागेवरुन संचालक वसंत खाडे आणि माजी संचालक बाबासाहेब चौगले यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. फक्त करवीर तालुक्याच्या संपर्क सभेसाठीच ही जागा अपुरी पडत असताना सर्वसाधारण सभा या ठिकाणी कशाला घेता, असा जाब चौगले यांनी विचारल्यानंतर त्यांच्याही दिशेने कार्यकर्त्यांनी धाव घेतली. यावरुन खाडे-चौगले यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली.
दरम्यान, गुंडगिरी करुन संस्था प्रतिनिधींना मारहाण केल्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. गोकुळ बचाव कृती समितीच्या सदस्यांनी घडलेल्या प्रकाराचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. तसंच याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे.