कोल्हापूर : साप.... नाग.... घोणस.... तस्कर.... मन्यार... ही नावं ऐकली तर भल्याभल्यांना घाम फुटतो, तर अनेकांची पळताभुई थोडी होते. पण हे सर्व सरपटणारे प्राण्यांचा सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये सुळसुळाट झाला आहे. एरव्ही ते जंगलात दिसतात, पण याच परिसरातील एका झाडाला लागलेल्या फुलांमुळे हे प्राणी जंगल सोडून मानवी वस्तीकडे आली आहेत.


पण गावात शिरणाऱ्या या सापांचं मूळ गावा शेजारच्या डोंगरावर आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा परिसरातील आसुर्ले, पोर्ले, वागवे या गावांमध्ये पूर्वी वनविभागाच्या वतीने वृक्षारोपणाच्या नावाखाली परदेशी वृक्ष 'ग्लेरिसिडीया'ची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली. या झाडांना वाढ असल्याने याची मोठी लागवड झाली, मात्र हीच झाडं सध्या गावकऱ्यांची डोकेदुखी ठरत आहे.

कारण मकरसंक्रांतीनंतर या झाडांना येणारी फुलं ही जंगलातील उंदीर, सरडा, पाली यासारख्या सरपटणाऱ्या प्राण्यांना जंगलाबाहेर पळवून लावत आहे. हे प्राणी जंगलातून निघून गेल्यानंतर भक्ष्याच्या शोधात असणारे साप, नाग, घोणसही आता मानवी वस्तीकडे येऊ लागले आहेत. "ही फुलं उंदरांसाठी विषारी असतात. त्यामुळे उंदीर त्या भागातून पळून जातात आणि त्यांच्यामागोमाग साप येतात," अशी माहिती वनस्पती तज्ज्ञ डॉ. मधुकर बाचुळकर यांनी दिली.

दिवसाला 5 ते 6, असे महिन्याभरात एकाच गावातून सर्पमित्रांनी महिन्याभरात 150 साप पकडले असून त्यांना वनखात्याकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.

ग्लिरिसीडिया म्हणजे काय?



ग्लिरिसीडिया... म्हणजेच गिरीपुष्प... म्हणजेच उंदीरमारी...

तीन नावं असलेली ही सुंदर फुलं सापांच्या या सुळसुळाटाला कारणीभूत ठरली आहेत

या वनस्पतीची वाढ तातडीने होत असल्याने वनविभागाकडून याची लागवड केली जाते

या वृक्षाचं वयोमान 15 ते 18 वर्ष आहे

या वृक्षांची उंची 70 ते 80 फुटांपर्यंत आहे

हिवाळ्यामध्ये या झाडांना फुलं येतात

ही फुलं प्राण्यांसाठी विषारी असतात

झाडांच्या पानांचा वापर खतांसाठी केला जातो.

कोल्हापूर जिल्ह्यात ज्या परिसराती ग्लिरिसीडिया या वृक्षांची लागवड आहे, त्याच परिसरात जानेवारी, ते मार्च या महिन्यात सर्पदंशाचे प्रमाण मोठे असल्याचे निरिक्षणातून सिद्ध झालं आहे. मागील वर्षी केवळ आसुर्ले, पोर्ले या गावांमध्ये जानेवारी महिन्यात 45हून अधिक नाग आणि घोणस सर्पमित्रांना सापडले आहेत आणि केवळ दोन दिवसात म्हणजे 14 ते 16 जानेवारी 2018  यादिवसात पोर्ले गावात 8 नाग आणि 5 घोणस सापडले आहेत. त्यांना पकडून वनविभागाच्या ताब्यात दिलं आहे.

"ज्यांना सापांचं महत्त्व कळतं, ते सर्पमित्रांना बोलवतात. पण बऱ्याच ठिकाणी सापांची हत्याच होते. साप धान्य वाचवतो, त्यामुळे त्याला मारलं, तर आपण आपल्याच पायावर धोंडा मारतो," अशी प्रतिक्रिया सर्पमित्र दिनकर चौगुले यांनी दिली.

पाहा व्हिडीओ