भंडारा : ट्यूशनला जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या 22 वर्षीय तरुणीचा मृतदेह नदीपात्रात आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. बेपत्ता झालेल्या प्रतिक्षा बागडेचा मृतदेह तब्बल चार दिवसांनी भंडारा शहरात वैनगंगेच्या नदीपात्रात सापडला. तिने आत्महत्या केली की तिची हत्या झाली, याचा शोध पोलिस घेत आहेत.


भंडारा शहरात लाला लजपतराय भागात राहणारी प्रतिक्षा बागडे 13 जानेवारीला संध्याकाळी शिकवणीला जात असल्याचं सांगून घराबाहेर पडली. मात्र रात्रीचे दहा वाजून गेल्यानंतरही मुलगी परत न आल्यामुळे तिच्या पालकांनी मित्र-मैत्रिणींकडे शोध घेतला.

प्रतिक्षाच्या मोबाईलवर कॉल केला असता तिच्याच एका मित्राने फोन उचलला आणि 'हॅलो' बोलून ठेवून दिला. पालकांना संशय येताच त्यांनी 14 जानेवारीला भंडारा शहर पोलिसात याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी शोध घेतला असता 16 तारखेला तिची दुचाकी स्कूटी वैनगंगा नदीच्या काठावर आढळली.

पोलिसांनी नदीपात्रात शोध घेतला असता मृतदेह मिळाला नाही. बुधवारी दुपारी वैनगंगा नदीपात्रात एक मृतदेह पाण्यात तरंगताना दिसला. मृतदेह पाण्याबाहेर काढला असता तो प्रतिक्षाचाच असल्याचं निष्पन्न झालं. तिच्या शरीरावर जखमा आढळल्यामुळे आणि तोंडातून रक्त निघत असल्याने प्रतिक्षाने आत्महत्या केली नसून तिची हत्या करुन मृतदेह पाण्यात फेकल्याचा आरोप पालक प्रकाश बागडे यांनी केला आहे.

ज्या दोन तरुणांवर पालकांनी संशय व्यक्त केला आहे, त्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेत तपास सुरु केला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यावर प्रतिक्षाने आत्महत्या केली, की तिची हत्या करुन पाण्यात मृतदेह फेकण्यात आला, हे स्पष्ट होणार आहे. प्रतिक्षाचा मोबाईल सचिन गजभिये या तरुणाकडे कसा आला, याचा तपास पोलिस करत आहेत.