कोल्हापूर : लघुशंका केल्याच्या कारणावरुन झालेल्या वादानंतर कोल्हापुरात पेट्रोलपंप मालकाने हवेत गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी संशयित मुकुंद रामचंद्र यादव याला शाहुपुरी पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली.

दाभोळकर कॉर्नर परिसरातील पेट्रोलपंप मालकाने एका प्रवाशाला धमकवण्यासाठी हवेत गोळीबार केला. गुरुवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकारामुळे दाभोळकर कॉर्नर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

दाभोळकर कॉर्नर परिसरातील पादचारी पुलाजवळ मुकुंद यादवचा पेट्रोलपंप आहे. गुरुवारी रात्री पेट्रोलपंपाजवळ एक प्रवासी लघुशंका करत होता. ते पाहून यादवचा भाचा सुनिल तळवडेने या प्रवाशाला हटकलं. त्यातून दोघांची वादावादी सुरु झाली.

वादावादी ऐकून या ठिकाणी गर्दी जमली. त्यामुळे यादवही पेट्रोलपंपाच्या केबिनमधून बाहेर आला. यावेळी जमावाने सुनिलला मारहाण केली.

हा जमाव आपल्या अंगावर येण्याच्या भीतीने, संबंधित प्रवाशाला धमकवण्यासाठी यादवने स्वत:जवळील पिस्तुल काढून हवेत गोळीबार केला. यादवचा हा अवतार पाहून जमावाची पळापळ झाली. त्यामुळे काही काळ वातावरणात तणाव निर्माण झाला.

हा प्रकार समजताच शाहुपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे, लक्ष्मीपुरी पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांच्यासह पोलिस फौजफाटा घटनास्थळी आला. पोलिस आल्याचं पाहताच जमाव पांगला.

या प्रकरणी संशयित मुकुंद यादव याला शाहुपुरी पोलिस ठाण्यात पोलिसांनी आणलं. त्याच्याकडे या प्रकरणाची कसून चौकशी सुरु होती. त्यासह संबंधित प्रवाशाकडून या घटनेची माहिती घेण्याचे पोलिसांचे काम सुरु होते.

घटनास्थळी पोलिसांना दोन पुंगळ्या सापडल्या. त्यांनी या पुंगळ्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणी यादव याच्यावर हत्येचा प्रयत्न, भारतीय हत्यार कायदा कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले आहे.