कोल्हापूर : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळने मोठा निर्णय घेतला आहे. दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत 25 वर्षांनी सत्तांतर झाल्यावर आज झालेल्या बैठकीत गोकुळ दूध खरेदी आणि विक्री दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंत्री सतेज पाटील यांनी दिली आहे. खरेदीत दरवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला असला तरी विक्री दरातही वाढ करण्यात आल्याने सर्वसामान्यांना मात्र नाराज केलं आहे.


गोकुळ दूध उत्पादक संघाने म्हशीच्या दूध खरेदी दरात 2 रुपयांची तर गायीच्या दूध खरेदी दरात 1 रुपयाने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दूध खरेदी दरात वाढ करण्यात आल्याने कोरोना परिस्थितीत दूध उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे. 11 जुलै पासून दरवाढ लागू होणार आहे. मंत्री हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची पत्रकार परिषदेत घोषणा केली आहे. कोल्हापूर जिल्हा वगळता ही दरवाढ लागू होणार आहे.


खरेदी दरासोबतच विक्री दरातही वाढ होणार आहे. विक्री दरात 2 रुपयांनी वाढ होणार आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुण्यात गोकूळ दूध संघाने देखील दूध विक्री दारात 2 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे आता याचा फटका मुंबई आणि पुणेकरांना बसणार आहे. विक्री दरवाढ 11 जुलै पासून लागू होणार आहे.