Kolhapur Football : कोल्हापूरचा बहुप्रतिक्षित फुटबॉल हंगाम नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात, सामान्य वेळापत्रकाच्या काही आठवड्यांपूर्वीच म्हणजेच लवकर सुरू होण्याची शक्यता आहे.


साखळी सामने कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन (KSA) मार्फत सुरुवातीला खेळवले जातील आणि नंतर पात्र संघ बाद फेरीत लढतील. प्रथम सामने KSA द्वारे आयोजित केले जातात आणि नंतर अनेक शीर्षक प्रायोजकांद्वारे (title sponsors) स्पर्धा आयोजित केल्या जातात.


KSA ने क्लबना त्यांचे संघ आणि संघ सदस्य नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. नोंदणी सुलभ करण्यासाठी ऑनलाईन पोर्टल सुरू केले जाईल, ज्यासाठी खेळाडूंची कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. 6 नोव्हेंबरपासून नोंदणी सुरू होणार असून दोन आठवडे चालण्याची शक्यता आहे.


संघांच्या प्रतिनिधींना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यास सांगितले आहे. प्रत्येक संघात किमान 16 आणि जास्तीत जास्त 23 खेळाडू असतील.


अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या अध्यक्षांकडून कोल्हापूरचा विशेष उल्लेख 


दरम्यान, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे नवनियुक्त अध्यक्ष कल्याण चौबे यांनी इंडियन सुपर लिगच्या नवव्या पर्वाच्या  उद्‍घाटनप्रसंगी केरळमध्ये बोलताना  बंगाल, केरळ यांच्या बरोबरच कोल्हापुरात देखील फुटबॉल चाहत्यांची मोठी संख्या असल्याचा विशेष उल्लेख केला होता. 


चौबे म्हणाले की, भारतात फुटबॉलचे मोठे चाहते आहेत. मुख्यतः केरळ, बंगाल, ईशान्येकडील राज्ये, तसेच महाराष्ट्रातील कोल्हापुरात देखील प्रचंड संख्येने चाहते सामन्यांसाठी हजेरी लावतात. त्यामुळे चाहत्यांना अधिकाधिक रोमांचक सामने आणि सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्नात आहे. एआयएफएफचे नवे कार्यकरिणी सदस्य मालोजीराजे छत्रपती यांनी कोल्हापूरमधील क्रेझ पाहण्यासाठी चौबे यांना आमंत्रित केले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या