कोल्हापूर: पतंग उडवण्यासाठी वापरात येत असलेला चायनीज मांजा वाहनधारकांच्या जीवावर बेतत आहे. दोनच दिवसांपूर्वी पुण्यातील एका महिला डॉक्टरचा चायनीज मांजामुळे जीव गेल्याचं प्रकरण ताजं असतानाच, तिकडे कोल्हापुरातील एक तरुणी पतंगाच्या मांजामुळे जबर जखमी झाली आहे. या चायनीज मांजामुळे ऐश्वर्या निंबाळकर या तरुणीच्या डोळ्यांना आणि मस्तकाला मोठी इजा झाली असून, तिला बारा टाके पडले आहेत. ऐश्वर्या निंबाळकर असं या तरुणीचं नाव आहे.

ऐश्वर्या रविवारी रात्री दुचाकीवरून आईसोबत रंकाळा परिसरातील देवकर पाणंद इथं राहणाऱ्या आजीकडे जात होती. देवकर पाणंद परिसरात येताच, तिच्या डोळ्यासमोर अचानक एक मांजा दोरा आला आणि काही कळण्यापूर्वीच तिच्या डोळ्यांवर अडकला. हा दोरा काही क्षणातच ऐश्वर्याच्या डोळ्याशेजारील भागात घुसला आणि रक्तस्त्राव सुरु झाला.

अचानक काय झालं हे कळण्यापूर्वीच ऐश्वर्या रक्तबंबाळ झाली. ऐश्वर्याला पाहून स्थानिकांनी तिला तातडीने शिवाजी पेठेतील कामत हॉस्पिटलमध्ये दाखल केले. यावेळी ऐश्वर्याच्या नाकाजवळ आणि डोळ्यासमोर घुसलेला दोरा डॉक्टरांनी काढला.

पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणारा चायनीज मांजा दोरा ऐश्वर्याच्या डोळ्यांच्या शेजारी गंभीररित्या घुसून, तिला मोठ्या जखमा झाल्या आहेत. इतकंच नाही तर तिच्या डोळ्याजवळ तब्बल 12 टाके पडले आहेत. केवळ नशीब बलवत्तर म्हणून ऐश्वर्या यातून बचावली.

दोनच दिवसांपूर्वी पुणे येथे एका महिला डॉक्टरचा पतंगाच्या मांजाने जीव गेल्याची बातमी, उदय निंबाळकर यांनी एबीपी माझावर पाहिली होती. हेच संकट आपल्या मुलीवर आल्याचं त्यांच्या लक्षात येताच त्यांनी पोलीस आणि एबीपी माझाशी संपर्क साधून याबाबतची माहिती दिली. मांजाने एखाद्याचा जीव जाऊ शकतो, त्यामुळे जागरुकतेच्या दृष्टीने निंबाळकरांनी पोलीस आणि माध्यमांशी संपर्क साधला.

ऐश्वर्याचं केवळ नशीब बलवत्तर म्हणून तिचा जीव वाचला. हाच दोरा जर तिच्या मानेपर्यंत आला असता तर अनर्थ घडला असता. तिच्यावर तात्काळ उपचार केल्यामुळे तिचे डोळे सुखरूप असल्याचं डॉक्टर आनंद कामत यांनी सांगितले.

कमी पैशांत न तुटणाऱ्या चायनीज मांजाची सध्या क्रेझ आहे. पतंग उडवणाऱ्यांना हा मांजा आनंद देत असला तरी तो वाहनधारकांसाठी जीवघेणा ठरत आहे. कमी जाडीचा मांजा डोळ्याला दिसत नाही. परिणामी मुख्य रस्त्यावरून जाताना वाहनधारकांना मांजा कापल्याने जीवघेण्या दुखापती झाली आहेत.  त्यामुळे तुमचा शौक दुसऱ्याच्या जीवावर उठत असेल तर सावधान!

संबंधित बातम्या 

मांजाने गळा चिरल्यावर 'ती' 20 मिनिटं रक्ताच्या थारोळ्यात, एकही गाडी थांबेना 

पतंगाच्या मांजामुळे गळा चिरुन पुण्यात महिला डॉक्टरचा मृत्यू