154 पीएसआयना मूळ पदावर पाठवणं ही मानहानी : अशोक चव्हाण
एबीपी माझा वेब टीम | 09 Oct 2018 12:34 PM (IST)
ही नियुक्ती आरक्षणातून बढती नव्हती तर खात्यांतर्गत सरळ सेवेतून एमपीएससी परीक्षा देऊन झालेली निवड होती, असा दावा नियुक्ती रद्द झालेल्या 154 जणांनी केला आहे.
अहमदनगर : "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखातं असतानाही पोलिसांना न्याय मिळत नाही. मॅटला दोष देण्यात अर्थ नाही, सरकारचं नियोजन नाही. मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहतात, पोलिसांना पदोन्नती देता, मग पुन्हा त्यांची नियुक्ती थांबवण्याची वेळ येते कशी?" असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी विचारला आहे. जनसंघर्ष यात्रेनिमित्त अहमदनगरमधील संगमनेर इथे पोहोचलेल्या अशोक चव्हाणांनी 154 पोलिसांच्या नियुक्तीसह विविध विषयांवर भाष्य केलं. मॅटच्या आदेशांतर राज्य सरकारने ठोस निर्णय न घेतल्याने, शपथ घेतलेल्या अनुसूचित जाती-जमातीतील 154 पोलीस उपनिरीक्षकांना आपलं पद गमवावं लागलं आहे. मॅटच्या आदेशांतर 154 प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षकांची नियुक्ती पुन्हा मूळ पदावर केली आहे. राज्य सरकारचा कायदा होत नाही तोपर्यंत भविष्य अंधारात असल्याने, 154 पीएसआयना आज पहाटेच नाशिकच्या प्रशिक्षण केंद्रातून बाहेर पाठवण्यात आलं. 9 महिने पीएसआय या पदाचं प्रशिक्षण घेतलं, त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शपथही घेतली. पण शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी 154 पीएसआयच्या नियुक्तीवर मॅटने स्थगिती आणली आहे. 154 फौजदारांच्या नियुक्त्या रद्द, मुख्यमंत्री काय निर्णय घेणार? मात्र मॅटच्या या स्थगितीमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. कारण सुप्रीम कोर्टाने बढतीतील आरक्षणाचा निर्णय संबंधित राज्यांवर सोपवला असताना, शपथ घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी 154 जणांची नियुक्ती मॅटने कशी रद्द केली असे प्रश्न विचारले जात आहेत. ही नियुक्ती आरक्षणातून बढती नव्हती तर खात्यांतर्गत सरळ सेवेतून एमपीएससी परीक्षा देऊन झालेली निवड होती, असा दावा नियुक्ती रद्द झालेल्या 154 जणांनी केला आहे. 154 PSI बाबत सरकारने ठोस निर्णय घ्यावा याविषयी बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, "ज्या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित राहतात, त्या पोलिसांना मानसन्मान मिळतो, त्यांना पुन्हा मूळ पदावर जाऊन काम करावं लागणं ही मानहानी आहे. सरकारच्या गलथान कारभाराचा नमुना आहे. संबंधित 154 पोलीस उपनिरीक्षकांबाबत सरकारने ठोस निर्णय घेणं आवश्यक आहे."