Kokan Tourism : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साहसी पर्यटनाला चालना देण्यासाठी तसेच स्थानिकांसाठी पर्यटनाच्या संधी निर्माण करून साहसी पर्यटन अधिक रोमांचकारी आणि अत्याधुनिक करण्यासाठी राज्य सरकारने काही पाऊलं उचलली आहेत. हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन मालवण येथील इंडीयन इन्स्टिट्युट ऑफ स्कुबा डायव्हिंग अँड अॅक्वाटीक स्पोर्टसच्या (इसादा) माध्यमातून वेंगुर्ले तालुक्यातील निवति रॉक जवळीक समुद्राच्या तळाचे अंतरंग न्याहाळण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या ताफ्यात एक अत्याधुनिक बोट दाखल होत आहे. जल पर्यटनाच्या क्षेत्रात भारतातील पहिली सुसज्ज आणि अत्याधुनिक बोट सामील करण्याचा मान एमटीडीसीला मिळाला आहे.
सिंधुदुर्गात आंतरराष्ट्रीय दर्जाचे जल पर्यटन विकसित करण्याच्या योजनेतील हा पहिला टप्पा आहे. एमटीडीसीच्या जलपर्यटन विभागाचे महाव्यवस्थापक डॉ.सारंग कुलकर्णी हे स्वतः ही बोट घेऊन पुद्दुचेरीहून सागरी मार्गाने मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. मुंबईत पोहोचल्यावर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या बोटीचे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यानंतर ही बोट सिंधुदुर्गात स्कुबा डायव्हिंगसाठी आणण्यात येणार आहे. दरम्यान दोन दिवसांच्या विश्रांतीसाठी ही बोट तारकर्ली येथे सोमवारी दाखल झाली आहे.
विदेशात आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्कुबा डायव्हिंग करण्यासाठी अत्याधुनिक पद्धतीची डायव्हिंग बोट वापरली जाते, ही बोटही अशीच असणार आहे. या बोटीवर स्कुबा डायव्हिंग करणाऱ्या पर्यटकांसाठी चेंजिंग रूम, प्रशस्त डेक आणि केबिन, लाईफ सपोर्ट यंत्रणा, उत्तम सीटिंग व्यवस्था असणार आहे. रात्री स्कुबा डायव्हिंग करण्यासाठी ही या बोटीवर व्यवस्था असणार आहे. तसेच अत्याधुनिक नेव्हीगेशन यंत्रणा ही या बोटीवर आहे. बोटीला हायस्पिडचे दोन कार्गो इंजिन आहेत. मालवण येथील एमटीडीसीच्या स्कुबा डायव्हिंग सेंटरमधून पर्यटकांना नीवती रॉक जवळील समुद्रात दर्जेदार स्कुबा डायव्हिंग घडवून आणण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले जात आहेत. परंतु निवती रॉक जवळ पर्यटकांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्कुबा डायव्हिंग करण्यासाठी अत्याधुनिक बोटीची गरज भासत होती. इसदाच्या ताफ्यात आता अत्याधुनिक बोट दाखल होत असल्याने निवती रॉक जवळील पर्यटनाला चार चांद लागणार आहेत.
बुधवारी ही बोट घेऊन डॉ. सारंग कुलकर्णी निघाले आहेत. एकूण 1800 किलोमीटरचा प्रवास करुन ही बोट येणार आहे. पाच राज्यांमधील रामेश्वर, कन्याकुमारी, कोचीन, मंगळूर, कारवार, मालवण, गणपतीपुळे असा प्रवास करून ही बोट मुंबईला पोहोचणार आहे. ही बोट आणण्यासाठी डॉ. कुलकर्णी यांच्या सोबत धीरज चोपडेकर, जितेश वस्त, वसंत येरम, नुपूर तारी अशी मालवणची टीम सोबत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण जवळच्या निवती रॉक परिसरातील समुद्रात आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन विकास केले जावे यासाठी 2007 साली जे स्वप्न पाहिले होते. त्या स्वप्नपूर्तीचा दिशेने रोमांचकारी प्रवास सिंधुदुर्ग जिल्हा करत आहे. अशी प्रतिक्रिया यावेळी समोर येत आहे.
हे ही वाचा -
- कोकण रेल्वेसाठी ऐतिहासिक दिवस! पहिल्यांदाच इलेक्ट्रिक इंजिनवर एक्सप्रेस चालली
- Nawab Malik : गोव्यात मध्यम वर्गालाही परवडणारं पर्यटन सुरू करणार, राष्ट्रवादीचा जाहीरनामा
- आदित्य ठाकरेंचा निर्णयांचा धडाका; आता साहसी पर्यटन धोरणास मान्यता, काय आहे पर्यटन धोरण?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha