उद्योगपती आनंद महिंद्रा, अभिनेता अक्षय कुमार यांच्यासह अनेक सेलिब्रेटींनी या बाप्पाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत संकल्पनेचं कौतुक केलं आहे. माढा तालुक्यातील मोडलिंब येथील संमती कला क्रीडा मंडळाने पर्यावरणाचा विचार करत चक्क एका झाडालाच बाप्पाचं रूप देत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला होता.
गणेशाची मूर्ती बसवण्याऐवजी अतिशय कल्पकतेने या मंडळातील कार्यकर्त्यांनी झाडालाच गणेशाचं रूप दिलं होतं. त्यावेळी गणेशाची प्रतिष्ठापना करताना इको फ्रेंडली बाप्पाचा विचार सुरु झाल्यावर मंडळाचे मार्गदर्शक आण्णाराव खंडागळे यांनी झाडालाच बाप्पाचे रूप देण्याची कल्पना मांडली आणि त्यांनीच लावलेल्या एका वृक्षाची निवड करून त्यावर काम सुरु करण्यात आलं.
झाडाला गणेशाचं रूप देताना कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही याची काळजी घेण्यात आली. यासाठी निवडलेल्या झाडाला बाप्पाच्या सोंडेचा फुगवटा, डोळ्यासाठीच्या खोबण्या या नैसर्गिक स्वरूपात असल्याने त्याला बाप्पाचं रूप देणं फारच सोपं गेलं.
झाडाला एका वैशिट्यपूर्ण रितीने फेटा बांधत बाप्पाचं मस्तक साकारण्यात आलं. यानंतर डोळे, सोंड आणि शरीरावर नैसर्गिक रंगाने रंगवून चेहरा आणि शरीराचा आकार बनवण्यात आला. कानासाठी सुपाचा वापर केला, तर दोन हात छापडीपासून बनवून कागदाचे दात आणि सुळे बनवण्यात आले. कमरेला पितांबर नेसवून बाप्पा उभा असल्याचा देखावा अतिशय कल्पकतेने बनवण्यात आला होता.
पर्यावरणाचा संदेश देणारा हा बाप्पा बनवण्यासाठी त्यावेळी अवघा 300 रुपये खर्च झाला होता. निसर्ग आणि वृक्ष म्हणजेच बाप्पा असून वृक्षाचं संवर्धन आणि जतन करा हा संदेश देणाऱ्या या तरुणाईने लाखो रुपयांची उधळपट्टी करणाऱ्या हजारो मंडळांना दिलेला संदेश आजही मार्गदर्शक ठरत आहे.