मुंबई : कोरोना पाठोपाठ महाराष्ट्रासमोर आणखी एक संकट समोर येऊन उभं ठाकलं आहे. 'निसर्ग' चक्रीवादळ 3 जून रोजी महाराष्ट्र आणि गुजरातच्या समुद्र किनार्‍यावर धडकणार असल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे मुंबईसह इतर जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासोबतचं 12 ते 24 तासात चक्रीवादळची तीव्रता देखील वाढणार आहे. हे चक्रीवादळ 3 तारखेला उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमधून जाणार आहे. यासोबतच रायगड, हरिहरेश्र्वर आणि दमणमधून देखील जाणार आहे. या वायदळाचा परिणाम रत्नागिरी, पालघरसह मुंबईवरही जाणवणार आहे.


अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं चक्रीवादळाचा धोका असल्याने आता कोकण किनारपट्टीला सतर्कतेचा आणि सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर आता जिल्हा प्रशासनाकडून देखील काळजी घेतली जात आहे. अशातच हे निसर्ग चक्रीवादळ म्हणजे, नक्की काय आणि यासंदर्भातील इतर अनेक प्रश्न प्रत्येकाच्याच मनात आहेत. जाणून घेऊया यासंदर्भातील सविस्तर माहिती...


अरबी समुद्रात तयार झालेल्या वादळाचं नाव कुणी दिलं?


- अरबी समुद्रात तयार होणाऱ्या आगामी चक्रीवादळाचे नाव निसर्ग असे आहे. हे नाव बांगलादेशने सुचवले आहे.


- उत्तर हिंदी महासागरामध्ये निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांच्या नावांची नवी यादी भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) गेल्या महिन्यात प्रसिद्ध केली होती.


- नव्या यादीमध्ये अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरालगतच्या 13 देशांनी सुचवलेल्या प्रत्येकी 13 अशा एकूण 169 नावांचा समावेश करण्यात आला आहे.


- अरबी समुद्रातील आगामी चक्रीवादळापासून या नव्या यादीतील नावे चक्रीवादळांना देण्यात येणार आहेत.


पाहा व्हिडीओ :  देशात जुलैमध्ये सरासरीच्या 103% तर ऑगस्टमध्ये 97% पाऊस पडणार - IMD हवामान विभाग



वादळांना नावं देण्याची सुरुवात कशी झाली?


- उत्तर हिंदी महासागरातील चक्रीवादळाला स्वतंत्रपणे ओळखता यावे यासाठी 2004 पासून आयएमडीच्या पुढाकाराने अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागराच्या क्षेत्रात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांचे नामकरण करण्यास सुरुवात झाली.


- त्यासाठी चक्रीवादळांच्या प्रभावाखाली असणाऱ्या आठ देशांनी सुचवलेल्या एकूण 64 नावांच्या यादीचा वापर करण्यात आला. या यादीमधील सर्व नावे चक्रीवादळांना देण्यात आली.


- त्यामुळे आयएमडीच्या पुढाकाराने चक्रीवादळांच्या नावांची नवी यादी तयार करण्यात आली. या यादीमध्ये पूर्वीच्या आठ देशांसह आणखी पाच देशांनी सुचवलेल्या नावांचाही समावेश करण्यात आला आहे.


- बांगलादेश, भारत, इराण, मालदीव, म्यानमार, ओमन, पाकीस्तान, कतार, सौदी अरेबिया, श्रीलंका, थायलंड, युनायटेड अरब अमिरातीज (युएई) आणि येमेन अशा 13 देशांनी सुचवलेल्या प्रत्येकी 13 नावांचा नव्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे.


- इंग्रजी अद्याक्षरांनुसार सर्व देशांची यादी तयार करण्यात आली असून, त्यांनी सुचवलेली नावे 13 रकान्यांमध्ये मांडण्यात आली आहेत. नव्याने तयार होणाऱ्या चक्रीवादळाला रकान्यातील देशांच्या क्रमानुसार एका पाठोपाठ एक नाव देण्यात येईल. 13 देशांनी सुचवलेल्या पहिल्या नावांचा रकाना संपला की, दुसऱ्या रकान्यातील नावे देशांच्या क्रमवारीनुसार देण्यात येतील.


भारताने कुठली नावे सुचवली आहेत?


- चक्रीवादळांच्या नव्या यादीमध्ये भारताने सुचवलेल्या गती, तेज, मुरासू, आग, व्योम, झोर, प्रोबाहो, नीर, प्रभंजन, घुरनी, अंबुड, जलाधी आणि वेग या 13 नावांचा समावेश करण्यात आला आहे.


चक्रीवादळाला नाव कशासाठी ?


- प्रत्येक चक्रीवादळाला स्वतंत्रपणे ओळखता यावे.


- त्याच्या समुद्रावरील विकासाविषयी जनजागृती व्हावी.


- एकाच वेळी दोन किंवा अधिक चक्रीवादळे निर्माण झाल्यास संभ्रम निर्माण होऊ नये.


- चक्रीवादळ स्मरणात राहावे.


- चक्रीवादळाविषयीची माहिती कमी वेळात अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी.


मुंबईत याआधी कधी वादळ धडकले होते?


- मुंबई लगतच्या कोकण किनारपट्टीवर चक्रीवादळ धडकण्याची घटना दुर्मिळ मानली जाते.


- गेल्या पन्नास वर्षांत 1968 आणि 2009 या दोन वर्षी उत्तर कोकणात चक्रीवादळ धडकल्याची उदाहरणे आहेत.


- 1968चे चक्रीवादळ हर्णै येथे, तर 2009 मध्ये फियान चक्रीवादळ अलिबाग आणि मुंबई यांच्या दरम्यान किनारपट्टीला धडकले होते.


- आता 11 वर्षांनी उत्तर कोकणात चक्रीवादळ धडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


आतापर्यंतची विनाशकारी चक्रीवादळं कुठली ठरली?


- भारतीय उपखंडात 1970 पासून 13 विनाशकारी चक्रीवादळे येऊन गेली ज्यांच्या वाऱ्यांचा वेग ताशी 200 किलोमीटरपेक्षा अधिक होता.


- 1970 मध्ये बांग्लादेशातील चित्तगोंग मध्ये धडकलेल्या चक्रीवादळाच्या तडाख्यात तीन लाख लोक मृत्युमुखी पडले होते.


- 29 ऑक्टोबर 1999 रोजी ओडीशातील पारादीपजवळ धडकलेल्या सुपर सायक्लोन मध्ये 15 हजार नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते.


संबंधित बातम्या : 


मुंबई, रत्नागिरी, पालघर, ठाण्यासह रायगडला चक्रीवादळाचा धोका! आपातकालीन व्यवस्था सज्ज


Monsoon | केरळमध्ये मान्सूनचं आगमन तर महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी