Kisan Sabha Long March :  किसान सभेच्या लाँग मार्चमधील (Kisan Sabha Long March)शेतकऱ्याचा मृत्यू झालाय. पुंडलिक जाधव असं मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. ते माहुडी ( तालुका, दिंडोरी जि. नाशिक ) येथील रहीवासी आहेत. जाधव यांच्या मृत्यूची वार्ता समजताच शहापूर येथील ग्रामीण रूग्णालयाबाहेर आंदोलक शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे, 


शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभेने नाशिक ते मुंबई असा लाँग मार्च काढला आहे.  आज (16 मार्च) या लाँग मार्चचा पाचवा दिवस आहे. या मोर्चाचा कालपासून ठाण्यात मुक्काम आहे. याच मोर्चातील पुंडलिक जाधव यांना आज अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांना ठाण्यातील शहापूर ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची बातमी काही क्षणात आंदोलकांपर्यंत पोहोचली. त्यामुळे आंदोलकांनी रूग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली आहे.  


नाशिक येथून 12 मार्च रोजी मुंबईच्या दिशेने शेतकऱ्यांचा लॉन्ग मार्च ( Long March)  निघाला आहे. विविध मागण्यांसाठी हा मोर्चा यापूर्वी देखील मुंबईच्या दिशेने निघाला होता. यापूर्वी दोन वेळेला हा मोर्चा शेतकऱ्यांनी काढला होता. या मोर्चाचे नेतृत्व किसान सभेने केले होते. माजी आमदार जे पी गावीत, डॉ. अजित नवले या शेतकरी नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा सुरू आहे. थेट विधानभवनावर कूच करण्यासाठी शेतकऱ्यांनी वाट धरली आहे. कुठलाही नेता आला तरी, मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मागे हटायचे नाही अशी भूमिकाच मोर्चेकऱ्यांनी घेतली आहे.  आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत निवेदन केले. कांद्याला देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करण्यात आली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 350 रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. आदिवासींच्या वनजमिनीच्या दाव्याबाबत समिती स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या समितीत माजी आमदार जीवा पांडू गावित आणि  आमदार विनोद निकोले यांचा समावेश असणार आहे. सरकार सगळ्याच मागण्यांबाबत सकारात्मक असून आता लाँग मार्च मागे घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. परंतु, मुख्यमंत्री केलेल्या घोणांचा लिखीत जीआर निघत नाही तोपर्यंत मोर्चा सुरूच ठेवू अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.  


काय आहेत मागण्या? 


कसणाऱ्यांच्या ताब्यात असलेली चार हेक्टर पर्यंतची वनजमीन कसणाऱ्यांच्या नावे करून 7/12च्या कब्जेदार सदरी कसणाऱ्यांचे नाव लावा. 


सर्व जमीन कसण्यालायक आहे असा उताऱ्यावर शेरा मारा. 


अपात्र दावे मंजूर करा. 


गायरान, बेनामी, देवस्थान, इनाम, वक्फ बोर्ड, वरकस व आकारीपड जमिनी कसणाऱ्यांच्या नावे करा. 


ज्या गायरान, गावठाण व सरकारी जमिनीवर घरे आहेत, ती घरे व घराची तळ जमीन राहात असणाराच्या नावे करा  


कांद्याला सहाशे रूपये अनुदान द्यावे  


दोन हजार रुपये दराने कांदा खरेदी नाफेडच्या माध्यमातून करावी 


थकीत वीज बिल माफ करून दिवसाची बारा तास लाइट देण्यात यावी 


अवकाळी पाऊस झाल्याने जे नुकसान झाले आहे त्याची मदतही तात्काळ द्यावी 

शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करून सातबारा कोरा करून द्या


पिकविमा मिळत नसून त्याबाबत विमा कंपनीवर कारवाई करा.


हिरडा योजना कायम ठेऊन अडीचशे रुपये हमी भाव द्यावा


47 रुपये गाईच्या दुधाला आणि म्हशीच्या दुधाला 67 रुपये भाव द्या 


दुधाचे मिल्कोमिटर आणि वजनाची स्वतंत्र यंत्रणा उभारा 


सोयाबीन, कापूस, तूर आणि हरभरा पिकाचा भाव स्थिर करा

रस्त्यात जाणाऱ्या शेतीच्या संदर्भात केरळ सरकारप्रमाणे मदत करा