Kisan Sabha Long March : किसान सभेच्या लाँग मार्चचा (Kisan Sabha Long March) आज (16 मार्च) पाचवा दिवस आहे. शेतकऱ्यांचा हा मार्च ठाणे (Thane) जिल्ह्यात दाखल झाला आहे. किसान सभेच्या (Kisan Sabha) शिष्टमंडळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत बैठक सुरू आहे.  12 जणांच्या  शिष्टमंडळाने (Delegation) मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासमोर आपल्या मागण्या मांडल्या.  यावर सध्या चर्चा सुरू आहे. 


दरम्यान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठीत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या आहेत. परंतु, जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत मोर्चा सुरूच राहणार असल्याची माहिती इंद्रजित गावित यांनी दिली आहे. "शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत. उद्या (शुक्रवारी) मोर्चा मागे घेणार आहोत. थोड्याच वेळात आंदोलकांच्या मागण्यासंदर्भामध्ये निवेदन पटलावर ठेवण्यात येणार असल्याची माहिती आमदार विनोद निकोले यांनी दिली.  तर शेतकऱ्यांच्या बहुतेक मागण्या मान्य झाल्या आहेत, अशी माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी एबीपी माझाला दिली. शुक्रवारी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या मोर्चाबाबत आणि त्यांच्या मागण्यांबाबत विधानसभा आणि विधान परिषदेत निवेदन करणार आहेत, असेही सत्तार यांनी सांगितलं. 


अखिल भारतीय किसान सभा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांनी नाशिकपासून लाँग मार्च काढला आहे. गेल्या पाच दिवसांपासून हा मार्च सुरू आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मागे हटणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. त्यामुळे या बैठकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे.