अहमदनगर : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने आज राज्यव्यापी नाशिक ते मुंबई वाहन मार्चला सुरुवात झाली. अकोले तालुक्यातील शेकडो वाहने नाशिककडे रवाना झाली आहेत. किसान सभेचे डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलक अकोले गावातून वाहनांच्या माध्यमातून रवाना झाले आहेत.
दिल्ली येथील आंदोलनाचे आता राज्यातही पडसाद उमटू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर 25 जानेवारीला मुबई येथील राजभवनावर मोर्चा काढण्यात येणार असून आज दुपारी अकोले येथून शेतकरी नाशिकला जमणार आहेत. त्या ठिकाणाहून राज्यातील अन्य शेतकरी जमा होतील व पुढे मुंबईकडे प्रवास सुरू होणार आहे. राज्यातील जवळपास 50 हजार शेतकरी राजभवनावर मोर्चा काढणार असल्याची माहिती अजित नवले यांनी दिली आहे.
सरकारकडून सर्व पर्याय दिलेत, आता शेतकऱ्यांनीच निर्णय घ्यावा : कृषीमंत्री
नवी दिल्लीत काल (22 जानेवारी) 11 व्या फेरीची बैठकही निष्फळ ठरली. बैठकीची पुढील तारीख अद्याप ठरलेली नाही. बैठकीत कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर म्हणाले की, 11 व्या फेरीत चर्चा झाली आहे. मात्र, अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. ते म्हणाले की सरकारकडून सर्वोत्कृष्ट प्रस्ताव देण्यात आला आहे, त्याचा शेतकऱ्यांनी विचार केला पाहिजे.
नरेंद्रसिंह तोमर म्हणाले, "मी हे कठोर अंतःकरणाने सांगतोय की शेतकर्यांकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही हे दुर्दैवी आहे." तुमच्या सहकार्याबद्दल सरकार कृतज्ञ आहे. कायद्यात कोणतीही कमतरता नाही. आम्ही तुमच्या सन्मानार्थ एक प्रस्ताव ठेवला आहे. आपण निर्णय घेऊ शकला नाहीत. आपण एखाद्या निर्णयापर्यंत पोहोचल्यास माहिती द्या. यावर पुन्हा चर्चा करू. तर बैठकीनंतर शेतकरी नेते म्हणाले की आम्ही कायदा रद्द करण्याच्या मागणीवर ठाम आहोत, आंदोलन कायम राहील. वाटाघाटीची पुढील तारीख निश्चित केलेली नाही.