नांदेड : नांदेड येथील आयडीबीआय बँकेत असलेल्या शंकर नागरी बँकेच्या खात्यातील 14 कोटी 50 लाख रुपयांचा ऑनलाईन दरोडा प्रकरणी नांदेड पोलिसांनी दोन महिलांसह एका हॅकरला ताब्यात घेतलं आहे. तिघांनाही दिल्लीतून ताब्यात घेतलं आहे. शंकर नागरी बँकेच्या खात्यातील 14 कोटीच्या या ऑनलाइन दरोडा प्रकरणी बँकेशी संबंधित व्यक्तीकडूनच बँकेचा महत्वपूर्ण गोपनीय डेटा हॅकर्सला कमिशनवर पुरविला गेला असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.


नांदेड शहरातील आयडीबीआय बँकेतील शंकर नागरी बँकेच्या खात्यावरून RTGS व NEFT द्वारे 14 कोटी 50 लाख रुपयांचा ऑनलाईन दरोड्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या प्रकरणी वाजीराबाद पोलिसांनी कर्नाटक राज्यातून दोन संशयित महिलांसह एका हॅकरला ताब्यात घेतले आहे. यातील एका महिलेचे नायजेरियन फ्रॉड करणाऱ्या व्यक्तीशी संपर्क असल्याचे तपासात उघड झाले आहे.


दिल्लीच्या मोहनपूरा भागात नायजेरियन बहुल वस्तीतून हॅकिंगचे प्रकार होत असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे. आतापर्यंतच्या तापसावरून हॅकर्सला बँकेचा डेटा पुरवणारी एखादी टोळी असून कमिशनवर ही टोळी ग्राहकांचा डेटा हॅकर्सला विकत असल्याची माहिती हाती आली आहे. त्यामुळे बँकेत माझे पैसे सुरक्षित आहेत म्हणणाऱ्या ग्राहकांनो सावधान, कारण तुमच्याही बँक खात्याचा डेटा कोणी चोरी करतंय का असा प्रश्न निर्माण होत आहे.