औरंगाबाद- 19 मार्च रोजी यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथे, महाराष्ट्रातील शेतकरी व किसानपुत्र हे आत्महत्या केलेल्या तमाम शेतकाऱ्याना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. त्या निमित्ताने औंढा येथून शेतकरी सहवेदना यात्रा निघणार आहे, अशी माहिती किसानपुत्र आंदोलनाचे अमर हबीब, डॉ राजीव बसरगेकर व अनंत देशपांडे यांनी दिली.


चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव करपे यांनी 19 मार्च 1986 रोजी संपूर्ण कुटुंबासह आत्महत्या केली होती. या घटनेने महाराष्ट्र हादरला होता. साहेबराव करपे यांनी मरताना लिहिलेल्या चिठ्ठीत शेतकऱ्यांच्या दुर्दशेकडे लक्ष वेधले होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. शेतकरी आत्महत्यांचा सिलसिला चालू राहिला. या वर्षी पुन्हा अधिकच्या आत्महत्या झाल्या.


या आत्महत्यांच्या कारणांचे निराकरण व्हावे यासाठी किसानपुत्र आंदोलनाच्या आवाहनानुसार दर वर्षी 19 मार्च रोजी लाखो लोक वैयक्तिक उपवास करतात. या वर्षी आत्महत्या केलेल्या तमाम शेतकाऱ्याना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. चिलगव्हाण (ता. महागाव, जि यवतमाळ) येथे हा कार्यक्रम होईल. सामूहिक आत्महत्या केलेल्या साहेबराव करपे यांचे हे गाव आहे.


शेतकरी सहवेदना यात्रा

11 मार्च महाशिवरात्रीच्या दिवशी बारा ज्योतिर्लिंगा पैकी एक असलेल्या औंढा येथील नागनाथाला साकडे घालून शेतकरी सहवेदना पदयात्रा काढली जाणार आहे. यात डॉ. राजीव बसर्गेकर, ब.ल. तामस्कर, रामकिसन रुद्राक्ष आदी शेकडो लोक सहभागी होणार आलेत. सुमारे 120 किलोमीटरची ही यात्रा 18 मार्चला महागावला पोहोचेल. 19 ला सकाळी महागाव येथे पोहोचलेल्या शेकडो संवेदनाक्षम नागरिकांबरोबर चिलगव्हाण कडे जाईल. दैठणा-परभणी येथील सुभाष कच्छवे व सोनपेठचे सुधीर बिंदू या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक आहेत.


या कार्यक्रमाच्या तयारीसाठी किसानपुत्र आंदोलनाचे अमर हबीब, अनंत देशपांडे आणि राजीव बसर्गेकर यांनी 18 जानेवारी ते 21 जानेवारी दरम्यान या सर्व भागाचा दौरा करून स्थानिक शेतकऱ्यांच्या व किसान पुत्रांच्या गाठी भेटी घेतल्या. या सर्व कार्यक्रमासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे