Maharashtra Mumbai India Weather Update: मुंबईसह राज्यभरात कालपासून पावसानं चांगलाच कहर केला आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये संततधार पाऊस सुरु असून राज्यातील अनेक भागांमध्ये पावसानं धुमाकूळ घातला आहे. आज महाराष्ट्राच्या विदर्भासह मुंबई क्षेत्रात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. बंगालच्या खाडीच्या वर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाचा अंदाज आहे.
विदर्भात सर्वाधिक पावसाचा अंदाज आहे. सोबतच मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात देखील पावसाची शक्यता आहे. यातील काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. मुंबई शहरासह नवी मुंबई, पनवेल, पालघर, ठाणे जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे.
मान्सूनच्या परतीचा प्रवास लांबणार असल्याची शक्यता आहे. वातावरण बदलांमुळे सलग तिसऱ्या वर्षी परतीच्या पावसाला विलंब झाला आहे. सप्टेंबर मध्यानंतर मान्सून माघारी फिरत असतो. मात्र, यावर्षी सप्टेंबर अखेर उजाडणार असल्याची माहिती आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रांमुळे पाऊस लांबण्याची चिन्ह होती. पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता, देशाच्या पूर्व व मध्य भागात सोमवारपासून पावसाचे प्रमाण वाढणार आहे. 20 सप्टेंबरपासून राज्यात पावसाचे प्रमाण वाढणार प्रामुख्याने विदर्भ क्षेत्रात सर्वत्र पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात देखील पावसाचा अंदाज आहे. आगामी 24 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान राज्यात सर्वत्र पुन्हा चांगल्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
सततच्या पावसामुळं शेतकरी राजा हवालदिल झाला आहे. ऐन काढणीला आलेली पिकं अनेक भागांमध्ये पाण्यात गेली आहेत. सोयाबीन, उडीद या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी केली जात आहे.