Sambhaji Bhide in Aurangabad : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. आंबेडकर अनुयायींच्या इशाऱ्यानंतर पोलिसांनी भिडे गुरुजींच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली. तसंच आयोजकांकडूनही सभा रद्द करण्यात आली आहे. आज (20 जुलै) रोजी औरंगाबाद (Aurangabad) दौऱ्यावर येणार होते. तर याचवेळी ते गंगापूर येथे आयोजित कार्यक्रमाला देखील हजेरी लावणार होते.
संभाजी भिडे यांच्या याच दौऱ्याला आणि कार्यक्रमाला आंबेडकर अनुयायींनी विरोध केला होता. तसेच गंगापूर येथे होणाऱ्या संभाजीराव भिडे यांच्या कार्यक्रमाला परवनगी देऊ नये, अन्यथा हा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा देण्यात आला होता. याबाबत आंबेडकर अनुयायी आणि शहरवासियांच्या वतीने पोलिसांना निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या या कार्यक्रमाची परवानगी नाकारली आहे. तर आयोजकांकडूनही भिडेंचा कार्यक्रम आणि सभा रद्द करण्यात आली आहे.
औरंगाबादच्या गंगापूर शहरात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गंगापूर या संघटनेतर्फे आज सायंकाळी 5 वाजता राधाकृष्ण मंगल कार्यालयामध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र गंगापूर शहरात कार्यक्रम झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. देशाला व राष्ट्राला हानीकारक असणारे वक्तव्य करण्याचा हेतू आहे. त्यामुळे शहारातील आणि तालुक्यातील शांतता बिघडवण्याचे काम होण्याची दाट शक्यता असल्याचा दावा करत या कार्यक्रमाला परवानगी न देण्याचे निवेदन पोलिसांना देण्यात आले होते. तसेच हा कार्यक्रम झाल्यास सभा आणि संबंधित कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांनी या कार्यक्रमाची परवानगी नाकारली आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या निमित्ताने नगरपालिकेनेही शहरातील खांबांवर लावलेले पोस्टर्स, बॅनर्स काढून घेतले आहेत.
आयोजकांकडूनही सभा रद्द
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गंगापूर या संघटनेतर्फे आज संभाजी भिडे यांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यासाठी संपूर्ण तयारी देखील करण्यात आली होती. तर भिडे गुरुजींचा वेळ देखील घेण्यात आली होती. तर या कार्यक्रमाचे पोस्टर्स, बॅनर्स देखील संपूर्ण शहरात लावण्यात आले होते. मात्र या कार्यक्रमाला विरोध करण्यात आला, तसेच सभा उधळून लावण्याचा इशारा देण्यात आला. पोलिसांनी देखील या सर्व पार्श्वभूमीवर भिडे गुरुजी यांच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली. त्यामुळे आयोजकांनी देखील एक पाऊल मागे घेत सभा रद्द केल्याची माहिती समोर येत आहे.
पोस्टर्स, बॅनर्स काढले...
संभाजी भिडे यांचा आज गंगापूर शहरात कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याने शहरातील अनेक भागात पोस्टर्स, बॅनर्स लावण्यात आले होते. भिडे यांचे स्वागत करणारे हे पोस्टर्स, बॅनर्स शहरातील मुख्य चौकात देखील लावण्यात आले होते. मात्र विनापरवानगी हे पोस्टर्स, बॅनर्स लावण्यात आल्याने स्थानिक प्रशासनाने ते काढून घेतले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: