Irshalwadi Landslide : रायगड (Raigad) जिल्ह्यातील खालापूरजवळील इर्शाळवाडी (Irsalvadi) इथे काल (19 जुलै) रात्री साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास घरांवर दरड कोसळली. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दुख व्यक्त करत यंदा आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच राज्यभरातील कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ, होर्डिंग, जाहिरातींवर खर्च न करता तो निधी इर्शाळवाडी गावाच्या पुनर्उभारणीसाठी उपयोगात आणावा, असं आवाहन केलं आहे.


इर्शाळवाडी दरड दुर्घटनेत दहा जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 100 लोक ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आतापर्यंत 80 लोकांना वाचवण्यात यश आलं आहे. बचावकार्यासाठी एनडीआरएफचं पथक घटनास्थळी पोहोचलं आहे. मात्र जोरदार पाऊस आणि वाट निसरडी झाल्यामुळे बचावकार्यात अडचण निर्माण होत आहेत. 


'निधी इर्शाळवाडी गावाच्या पुनर्उभारणी आणि ग्रामस्थांच्या मदतीसाठी उपयोगात आणा'


या घरांवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. सोबतच यावर्षी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस असून राज्यभरातील त्यांचे चाहते, कार्यकर्ते, हितचिंतक दरवर्षी मोठ्या प्रमाणावर हा वाढदिवस साजरा करतात. परंतु इर्शाळवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कुणीही आपला वाढदिवस साजरा करु नये. पुष्पगुच्छ, होर्डिंग, जाहिरातींवर खर्च न करता तो निधी इर्शाळवाडी गावाच्या पुनर्उभारणी आणि ग्रामस्थांच्या मदतीसाठी उपयोगात आणावा, असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे.


अजित पवारांकडून नियंत्रण कक्षातून दुर्घटनेचा आढावा


दरम्यान, रायगडमधील इर्शाळवाडीमध्ये घडलेल्या दुर्घटनेचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नियंत्रण कक्षातून आढावा घेतला आहे. राज्याचे प्रमुख स्वत: घटनास्थळी आहेत. हेलकॉप्टर तयार आहे, पण खराब वातावरणामुळे तिथे ते उतरु किंवा थांबू शकत नाही. त्यामुळे हाताने बचावकार्य करण्याशिवाय पर्याय नाही, असं अजित पवार म्हणाले. तसंच मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. तर जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च हा सरकार करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. यामध्ये संपूर्ण कामाला लागली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. आतापर्यंत या दुर्घटनेमध्ये 80 जणांना वाचवण्यात यश आल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे.  


हेही वाचा