अमरावती : वर्ष संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. नववर्षाच्या सेलिब्रेशनला कुठंतरी लांब जावं आणि मनमुराद आनंद नववर्षाच्या स्वागताचा घ्यावा असा तुम्ही प्लॅन करत असाल तर त्यासाठी योग्य स्थळ आहे ते म्हणजे विदर्भाच कश्मीर म्हणून ओळख असलेलं चिखलदरा देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांच्या गर्दीने विदर्भाचे काश्मीर फुलून गेले आहे.


दूरवर पसरलेली धुक्याची चादर, श्वास रोखून धरायला लावणाऱ्या पर्वत रांगा, हजारो फूट उंचीवरुन कोसळणारे धबधबे, नागमोडी रस्ता, वातावरणात गारवा हाड गोठवणारी थंडी, मेळघाटातील चिखलदरा मधील सध्या राज्यात थंडीची लाट सुरू आहे. अशातच आधीच थंड वातावरण असलेल्या चिखलदरा मध्ये थंडीने उच्चांक गाठला आहे. याच थंडीत चिखलदऱ्याचे सौंदर्य आणखी फुलले आहे. साधारण जुलै महिन्यापासून चिखलदरा मधील पर्यटन हे सुरू होत असते. मात्र यावेळी कोरोनामुळे हे ठिकाण ठप्प झालं होतं, आता हळू हळू चिखलदरा पूर्वपदावर येत आहे.


सध्या वातावरणात असलेला गारवा याचा आनंद लुटण्यासाठी त्यात ख्रिसमस नाताळ आणि सरत्या वर्षाला निरोप, नववर्षाच्या सेलिब्रेशन साठी राज्यभरातून पर्यटक दाखल झाले आहे. निसर्गात असलेली अद्भूत किमया ही आपण ही येऊन अनुभवतो असं पर्यटक सांगतात. चिखलदरा मध्ये देवी पॉईंट, गाविडगड किल्ला तर अक्षरशः गर्दीने फुलून गेला आहे. उंच पहाडावर असलेली घोडा सवारी, उंट सवारी, सायकल सवारी यामुळे पर्यटकाची पसंती देवी पॉईन्टला दिसून येत आहे. विदर्भाच्या या काश्मीरमध्ये विविध पाहण्याजोगे पॉईंन्ट आहे. देवी पॉईंन्ट लगत असलेल्या तलावावर बोटिंगचा आनंद घेता येतो. दैनंदिन कामात महिला वर्षभर व्यस्त असतात पण चिखलदरा मध्ये आलो की वर्ष भराचा ताण निघून जाऊन नवीन शक्ती या निसर्गातून मिळते अस पर्यटक सांगतात.


समुद्र सपाटी पासून हजारो किलोमीटर वर असलेल्या चिखलदरा हे पर्यटकांना भूरळ पाडणारे आहे. सोबतच जवळच असलेले सीमाडोह आणि जंगलातील हत्ती सफारीसाठी प्रसिद्ध असलेले येथे पर्यटक जाऊन निसर्गाचा मनमुराद आनंद घेतात. निसर्गाचा हा अद्भूत नजरा साक्षात अनुभवायचा असेल आणि नववर्षाच्या सेलिब्रेशनचा विचार तुमच्या मनात सुरू असेल तर तुम्ही चिखलदरा प्लॅन करायला हरकत नाही.