बीड: हिजाब विरुद्ध भगवा असा वाद कर्नाटकमध्ये पेटलाय. त्यामुळे कर्नाटक मधल्या शाळा आणि महाविद्यालय तीन दिवसांसाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत. मात्र या वादाचे पडसाद केवळ कर्नाटक राज्यापुरते मर्यादित राहिले नाहीत तर थेट महाराष्ट्रात पोहोचले आहेत. बीडमध्ये आता हिजाबच्या समर्थनार्थ एमआयएम पक्षाच्या वतीनं बॅनर लावण्यात आले आहेत.


हिजाबच्या समर्थनार्थ एमआयएमकडून बीडमध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे. बीडचे एमआयएम आघाडीचे जिल्हाध्यक्ष लुकमान फारुकी यांनी हिजाबच्या समर्थनात होल्डिंग्स लावले आहेत. कर्नाटकामध्ये निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हिजाबला विरोध केला जातोय, त्यामुळे संविधानाने दिलेल्या अधिकाराचा आम्ही वापर करत असून देशात हिंसा भडकवण्यासाठी काही लोक हिजाबला बदनाम करत असल्याचं लुकमान यांचं म्हणणं आहे.


हिजाब आमचा अधिकार असल्याचं एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी आणि खासदार इम्तियाज जलील यांनी संसदेत बोलताना सांगितल. यातूनच आता बीडमध्ये देखील हिजाबच्या समर्थनात एमआयएमचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. 'जय श्रीराम'च्या नाऱ्याला आमचा विरोध नसून रामाच्या नावावर देशात दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम काही लोक करत असल्याचा आरोप एमआयएमने केला आहे.


यापूर्वीही तेलंगणा आणि कर्नाटकात झालेल्या आंदोलनाचे पडसाद बीडमध्ये अनेकदा उमटले आहेत. पूर्वी बीडसह मराठवाडा हा  निजाम संस्थानच्या ताब्यात होता. त्यामुळे या दोन राज्यातील घटनांचे पडसाद बीडमध्ये उमटले आहेत. 


कर्नाटकात तीन दिवस महाविद्यालयं बंद
हिजाबवरुन वाढत्या वादामुळं कर्नाटकातल्या शाळा आणि महाविद्यालये तीन दिवस बंद ठेवणयात येणार आहेत. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे. राजकीय पक्षांच्या हातातलं खेळणं बनू नका असं सांगत विद्यार्थ्यांना शांतता राखण्याचं आवाहनही त्यांनी केले आहे. 


हिजाबवरुन कर्नाटकातल्या काही कॉलेजमध्ये विद्यार्थिनींना प्रवेश नाकारण्यात आला होता. त्यामुळं मुलींनी आंदोलन सुरु केलं होतं. त्याला उत्तर देण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यानंतर दोन्ही बाजूच्या विद्यार्थ्यांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली. काही शाळांसमोर दगडफेकही झाली होती. यानंतर आता कर्नाटक सरकारनं शाळा, कॉलेजेस तीन  दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.


संबंधित बातम्या: