बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांच्या विरोधात महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी प्रचार करू नये असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र प्रदेश भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांची भेट घेऊन केले. इतर ठिकाणी प्रचार करा, पण समितीची उमेदवार ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी भाजप नेत्यांनी प्रचार करु नये अशी विनंती यावेळी करण्यात आली. या आधी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्रातील भाजप नेते मए समितीच्या उमेदवारांच्या विरोधात प्रचाराला येणार नाही असं आश्वासन दिलं असल्याचंही यावेळी समितीच्या वतीनं सांगण्यात आलं.


कर्नाटकातील विधानसभा निवडणूक 10 मे रोजी होणार असून महाराष्ट्रातून वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, चित्रा वाघ प्रचारासाठी बेळगावात दाखल झाले आहेत. त्यावर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनं नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. समितीच्या कार्यकर्त्यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांची भेट घेतली. त्यावेळी समितीच्या वतीनं सांगण्यात आलं की, "एकीकडे महाराष्ट्र सरकार आम्हा सीमावासियांच्या पाठीशी आहे असे सांगते, आझाद मैदानावर सीमावासियानी केलेल्या आंदोलनाच्या वेळी मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी भाजप नेते प्रचारासाठी येणार नाहीत असे आश्वासन दिले होते. ते आश्वासन पाळून आता महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांच्या विरोधात प्रचार करू नका. कर्नाटकात अन्य ठिकाणी प्रचार करा."


समितीचा निरोप वरिष्ठांना कळवणार


महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनं करण्यात आलेली विनंती ही वरिष्ठांच्या कानावर घालण्यात येईल असं भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सांगितलं. एक कार्यकर्ती म्हणून मला आपल्यासाठी जे काही करता येईल ते सर्व मी करणार असं आश्वासनही चित्रा वाघ यांनी मए समितीला दिलं. 


यावेळी चित्रा वाघ यांनी आपला निरोप मी पक्षाच्या वरिष्ठांना कळवते.एक कार्यकर्ती म्हणून मला आपल्यासाठी जे काही करता येईल ते मी करेन असे आश्वासन दिले. मए समितीचे सूरज कणबरकर , गणेश दड्डिकर, शिवानी पाटील, सागर पाटील, महादेव पाटील आणि मोतेश बारदेशकर या कार्यकर्त्यांनी चित्रा वाघ यांची भेट घेतली. 


दरम्यान, महाराष्ट्र एकीकरण समितीचे बेळगाव ग्रामीण मतदार संघातील उमेदवार आर.एम.चौगुले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी समितीवरील आपली निष्ठा व्यक्त करण्यासाठी जनसागर लोटला होता.हा अर्ज भरण्यासाठी धर्मवारी संभाजी चौक येथे हजारो कार्यकर्ते जमले होते. धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नेते मंडळी आणि कार्यकर्ते अर्ज दाखल करण्यासाठी निघाले. हातात भगवे ध्वज आणि डोक्यावर भगवी टोपी यामुळे सगळे वातावरण भगवेमय होऊन गेले होते. रस्त्यावर भगवा सागर पसरल्याचे दृश्य यावेळी पाहायला मिळाले. बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, रहेंगे तो महाराष्ट्राने मे, नही तो जेलमे, कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही अशी जोरदार घोषणाबाजी कार्यकर्त्यांनी केली. समितीचे उमेदवार आर.एम.चौगुले हे बैलगाडीतून मिरवणुकीत सहभागी झाले होते.


बेळगाव ग्रामीण मतदार संघातून भाजप उमेदवार नागेश मनोळकर यांनी तर काँग्रेसकडून लक्ष्मी हेब्बाळकर यांनी अर्ज भरला आहे.