अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे एका लग्नात हे धर्माच्या पलीकडचं नात पाहिला मिळालंय. सध्या सोशल मीडियावर या लग्नातील काही फोटो व्हायरल झाले आहेत. या लग्नाची चर्चा शेवगाव तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात जोरदार सुरू आहे. एका मुस्लिम समाजातील व्यक्तीने हिंदू समाजातील मानलेल्या बहिणीच्या मुलींचे कन्यादान केलंय.
शेवगाव तालुक्यातीक बोधेगाव येथे सविता भुसारी या शेतकरी कुटुंबातील असून, त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. नवऱ्याने सोडून दिल्याने त्या आईवडिलांकडे राहत आहेत. तिथेच त्यांनी त्यांच्या मुलींना मोठे केले. तसेच या महिलेला भाऊ नसल्याने त्यांनी घरासमोर राहणाऱ्या बाबा पठाण यांना गुरू भाऊ मानले आहे. बाबा पठाण यांनी देखील जाती-पातीच्या पलीकडे जाऊन माणुसकी धर्म दाखवत हिंदू मुलींचे मामा होऊन कन्यादान केले. एव्हढेचं नव्हे तर विवाहाचा अर्धा खर्च करुन मानलेल्या बहिणीच्या मुलींच्या सुखी संसाराला सुरुवात करुन दिलीय.
हे फोटो समोर आल्यानंतर सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाले आहेत. तसंच अनेकजण या सामाजिक एकतेचे उदाहरण असलेल्या फोटोवर आपली भावना देखील व्यक्त करत आहेत.
प्रसिद्ध ब्लॉगर आणि लेखक समीर गायकवाड यांनी हे फोटो शेअर करत म्हटलंय की, आपल्या भारताचं हे खरं चित्र आहे..."खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे" या साने गुरुजींच्या उक्तीचा अर्थ सर्वांना कळेल तो सुदिन असेल.. बोधेगाव जिल्हा अहमदनगर येथील भुसारे परिवारातील दोन मुलींच्या लग्नात मामाचे विधी बाबा भाई पठाण यांच्या हस्ते संपन्न झाले. नवऱ्या मुलींची आई दरवर्षी बाबा भाई ना राखी बांधते कारण तिला सख्खा भाऊ नाही..भावाची व मामाची भुमिका बाबा भाई पठाण यांनी बजावली.. मानवता, प्रेम आणि विश्वास जिथे एकदिलाने नांदतात तिथे व्यवहारातल्या भौतिक बाबी गौण ठरत जातात, असं समीर गायकवाड यांनी लिहिलंय.