Aaditya Thackeray - Maharashtra Assembly Session 2021 :  राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना देण्यात आलेल्या धमकीच्या प्रकरणाची चौकशी एसआयटी मार्फत करणार असल्याची घोषणा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली. आदित्य ठाकरे यांना देण्यात आलेल्या धमकी प्रकरणाची विधानसभेत चर्चा झाली. यावेळी आरोपीच्या कर्नाटक संबंधावरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी भाजपमध्ये जोरदार खडाजंगी झाली. 


विधानसभेत झालेल्या चर्चेनंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आदित्य ठाकरे धमकी प्रकरणातील आरोपीला बंगळुरूमधून अटक करण्यात आली असल्याची माहिती दिली. आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून एसआयटी मार्फत चौकशी होणार असल्याचे त्यांनी म्हटले.  


तत्पूर्वी, विधानसभेत शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी हा मुद्दा मांडला. आदित्य ठाकरे यांना धमकी देणाऱ्या आरोपींचा संबंध कर्नाटकशी असल्याच्या कारणाने महाविकास आघाडी आणि भाजप आमदारांमध्ये खडाजंगी झाली. आदित्य ठाकरे यांना धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई सायबर पोलिसांनी कर्नाटकमधून अटक केली. शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी म्हटले की, आरोपी हा कर्नाटक मध्ये सापडला आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, गौरी लंकेश यांची हत्येचे धागेदोरे कर्नाटकमध्ये आहेत. या प्रकरणाचे काही धागेदोरे आहेत का, याचा उहापोह झाला पाहिजे. कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असल्याचा मुद्दा प्रभू यांनी मांडला. 


राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनीदेखील या मुद्यावर विधानसभेत आपली भूमिका मांडताना भाजपवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. नवाब मलिक यांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या आडून महाराष्ट्रातील मंत्र्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. आत्महत्येसाठी अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर आरोप करून तिला गोवण्याचा प्रयत्न झाला. आत्महत्या मुंबईत झाली आणि बिहारमध्ये तक्रार नोंदवण्यात आली. तो तपास करण्यासाठी आलेले बिहार पोलीस अधिकारी मर्सिडिज कारमध्ये फिरत होते. ही कार भाजपच्या एका नेत्याची होती. सुशांत सिंह राजपूत आतापर्यंत ट्रेड होत आहे. तस्करी प्रकरणातील निलोत्पल उत्पलला सोशल मीडियावर ट्रेंड करण्यासाठी 30 लाख रुपये पुरवले. आम्हालाही धमक्या येत आहेत. या सगळ्या प्रकरणाचे धागेदोरे कर्नाटकशी जोडले आहेत. त्यामुळे आयपीएस अधिकारी असलेल्या एका एसआयटीच्या माध्यमातून चौकशी करण्याची मागणी मलिक यांनी केली.  यावेळी त्यांनी सनातन संस्थेवरही प्रश्न उपस्थित केले. 


विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना आलेल्या धमकीचा निषेध केला. फडणवीस यांनी म्हटले की, या धमकी प्रकरणाला आता राजकीय रंग देण्याचा प्रयत्न सुरू आहे. नवाब मलिक यांनी मागणी केल्याप्रमाणे एसआयटी चौकशी झाली पाहिजे. सनातन संस्था असेल तर दोन वर्षांपासून तुमचे सरकार आहे, त्यामुळे तुम्ही काय कारवाई केली असा प्रश्नही फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांना विचारला. 


मिलिंद नार्वेकर यांना धमकी दिली त्या प्रकरणाच्या चौकशीची स्थिती काय आहे, असा प्रश्न भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला.  मंत्रालयात दारूच्या बाटल्या सापडल्या, त्याची चौकशी काय झालं असेही त्यांनी विचारले. धमकी संदर्भात एक चौकशी समिती नेमली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.