kamada Ekadashi and Mahavir Jyanati 2023 : एप्रिल महिना (April 2023) लवकरच सुरु होणार आहे. या महिन्यात अनेक सण, उत्सव तसेच थोर महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी आहेत त्यामुळे एप्रिल महिना विशेष खास आहे. पण, त्याचबरोबर एप्रिल महिना आणखी एका कारणामुळे खास आहे ते म्हणजे या महिन्यात कामदा एकादशी आणि महावीर जयंती दोन वेळा राज्यातील वेगवेगळ्या भागांत साजरी केली जाणार आहे. याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 


कामदा एकादशी 


भगवान विष्णूची पूजा कामदा एकादशीच्या दिवशी केली जाते. या दिवशी उपवास केल्याने सर्व प्रकारच्या दु:खापासून मुक्तता मिळते. असे मानले जाते की, या दिवशी उपवास केल्याने भगवान विष्णू अपूर्ण इच्छा पूर्ण करतात. म्हणून त्याला फलदा एकादशी किंवा कामदा एकादशी असेही म्हणतात. 


कालनिर्णयनुसार, कामदा एकादशी 1 एप्रिल आणि 2 एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे. यामध्ये दिलेल्या संदर्भानुसार, दिनांक, 1 एप्रिल रोजी शनिवारी कामदा एकादशी दिलेली आहे. दिनांक, 2 एप्रिल रोजी द्वादशी समाप्ती 30.25 आहे. ज्या गावी दिनांक 2 एप्रिल रोजी सकाळी 06.25 पूर्वी सूर्योदय होत असेल तेथे द्वादशी तिथीची वृद्धी होत असल्याने स्मार्त आणि भागवत अशा दोन एकादशी असणार आहे. तर, काही प्रदेशात 06.25 पूर्वी सूर्योदय होत असल्याने शनिवारी दिनांक 1 एप्रिल रोजी स्मार्त आणि रविवारी 2 एप्रिल रोजी भागवत एकादशी असेल. मात्र, रेषेच्या डावीकडील प्रदेशात दिनांक 1 एप्रिल रोजी सर्वांसाठी एकच एकादशी असेल. 


रेषेच्या डावीकडील एकच एकादशी असलेली काही प्रमुख गावे : 


महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक, संगमनेर, शिर्डी, मालेगांव, बारामती, फलटण, सातारा, कराड, कोल्हापूर, सांगलीसह संपूर्ण कोकण प्रदेश, संपूर्ण गोवा, संपूर्ण गुजरात, कर्नाटकातील बेळगाव, गोकाक, कारवार, मंगळुरू, उड्डपी, शिरसी, राजस्थानातील उदयपूर, जोधपूर, बिकानेर या प्रदेशात शनिवारी दिनांक 1 एप्रिल रोजी एकच एकादशी आहे. 


रेषेच्या उजवीकडील दोन एकादशी असलेली काही प्रमुख गावे : 


महाराष्ट्रातील सोलापूर, पंढरपूरसह अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव, जालना, संपूर्ण मराठवाडा, संपूर्ण विदर्भ, कर्नाटकातील हुबळी, धारवाडसह विजापूर, कलबुर्गी, होसपेट, बागलकोट, गदग, हावेरी, म्हैसूर, बंगळूरू, संपूर्ण मध्य प्रदेश, राजस्थानातील जयपूर, अजमेर, संपूर्ण हरियाणा आणि पंजाब या प्रदेशांमध्ये शनिवारी दिनांक 1 एप्रिल रोजी स्मार्त आणि रविवारी दिनांक 2 एप्रिल रोजी भागवत एकादशी आहे. 


महावीर जयंती 


जैन धर्मातील चोवीस तीर्थंकरांपैकी अखेरचे तीर्थंकर. महावीरांच्या आधी जैन धर्माचे 23 तीर्थंकर  होऊन गेले, असे जैन धर्माचे अनुयायी मानतात. जैन धर्माला प्रभावशाली बनविण्याचे फार मोठे श्रेय महावीरांकडे जात असल्यामुळे जगातील प्रमुख धर्मसंस्थापकांच्या बरोबरीने त्यांचे नाव घेतले जाते. एप्रिल महिन्यात महावीर जयंती देखील दोन दिवस साजरी केली जाणार आहे. 


कालनिर्णयमध्ये दिलेल्या संदर्भानुसार, 3 एप्रिल रोजी सोमवारी - महावीर जयंती दिलेली आहे. चैत्र  शु. त्रयोदशीच्या दिवशी महावीर जयंती साजरी केली जाते. त्रयोदशी अहोरात्र असल्यास अहोरात्रीच्या दिवशी महावीर जयंती साजरी केली जाते.  2 एप्रिल रोजी द्वादशी समाप्ती 30.25 म्हणजे 3 एप्रिलच्या सकाळी 06.25 असल्याने महाराष्ट्रात काही प्रदेशात त्रयोदशीची वृद्धी होत आहे.


सोबतच्या नकाशात  2 एप्रिल 2023 रोजीची द्वादशी समाप्तीची (सकाळी 06.25 ची) सूर्योदय रेषा दिलेली आहे. या रेषेच्या उजवीकडील गावांत 06.25 पूर्वी सूर्योदय होत असलेल्या प्रदेशात द्वादशी तिथीची वृद्धी होत असून सोमवारी सूर्योदयानंतर द्वादशी तिथी संपते आहे. म्हणून या प्रदेशात 4 एप्रिल रोजी मंगळवारी त्रयोदशीच्या दिवशी महावीर जयंती आहे. मात्र रेषेच्या डावीकडील प्रदेशात  3 एप्रिल रोजी सोमवारी त्रयोदशी अहोरात्र असल्याने या प्रदेशात महावीर जयंती  3 एप्रिल रोजी आहे.


रेषेच्या डावीकडील 3 एप्रिल रोजी महावीर जयंती असलेली काही प्रमुख गांवे :


महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक, संगमनेर, शिर्डी, मालेगाव, बारामती, फलटण, सातारा, कराड, कोल्हापूर, सांगलीसह संपूर्ण कोकण प्रदेश, संपूर्ण गोवा, संपूर्ण गुजरात, कर्नाटकातील बेळगाव, गोकाक, कारवार, मंगळूरु, उडुपी, शिरसी, राजस्थानातील उदयपूर, जोधपूर, बिकानेर या प्रदेशात सोमवारी 3 एप्रिल रोजी महावीर जयंती आहे.


रेषेच्या उजवीकडील 4 एप्रिल रोजी महावीर जयंती असलेली काही प्रमुख गांवे :


महाराष्ट्रातील सोलापूर, पंढरपूरसह, अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव, जालना, संपूर्ण मराठवाडा आणि संपूर्ण विदर्भ, कर्नाटकातील हुबळी, धारवाडसह विजापूर, कलबुर्गी, होसपेट, बागलकोट, गदग, हावेरी, म्हैसूर, बंगळूरू, संपूर्ण मध्य प्रदेश, राजस्थानातील जयपूर, अजमेर, संपूर्ण हरियाणा आणि पंजाब या प्रदेशांमध्ये  4 एप्रिल रोजी महावीर जयंती आहे.


महत्त्वाच्या बातम्या :


Important Days in April 2023 : 'एप्रिल फूल डे', 'अक्षय्य तृतीया', 'रमजान ईद'सह एप्रिल महिन्यातील 'हे' आहेत महत्त्वाचे दिवस; वाचा संपूर्ण यादी