Kalyan Latest News : कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने एका पिस्तुल तस्कराला सापळा रचत अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे पोलीस या तस्करचा पाठलाग करत असताना त्याने पोलिसांना घाबरवण्यासाठी जमिनीच्या दिशेने गोळ्या झाडल्या. मात्र पोलिसांनी जीवाची पर्वा न करता मोठया धाडसाने या तस्कराचा पाठलाग करत पकडलं. सुरज शुक्ला असे या तस्कराचे नाव आहे. तो मध्यप्रदेश येथे राहणारा आहे.


सुरज शुक्लाकडून 2 पिस्टल 2 मॅगझीन 16 काडतुस जप्त करण्यात आल्या आहेत. त्याने हे पिस्तुल कुणाला विकण्यासाठी आणले होते? आधी किती पिस्तुल विकलेत? याचा तपास पोलीस करत आहेत . दरम्यान काही दिवसांपूर्वी कल्याण पश्चिममध्ये पिस्तुल विक्री करण्यास आलेल्या एका इसमाला अटक करण्यात आली होती. या घटनेला काही दिवस उलटत नाही तोच पुन्हा एका पिस्तुल तस्कराला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे हे तस्कर कल्याण मध्ये कुणाला पिस्तुल विक्री करतात याचा शोध लावण्याचे आव्हान पोलिस यंत्रणेसमोर उभं ठाकले आहे


कल्याण बाजारपेठ पोलिसांना एक इसम कल्याण पश्चिमेकडील लाल चौकी परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार बाजार पेठ पोलीस ठाण्याचे एपीआय सुजित मुंडे, घोलप, पोलीस नाईक सचिन साळवी, भीमराव बागुल, बाविस्कर, पोलीस हवालदार जातक, अत्तार, भोसले या पथकाने लाल चौकी परिसरात सापळा रचला. एक इसम संशयास्पद आढळून आल्याने पोलिसांनी त्याला हटकले मात्र या इसमाला संशय आल्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. पोलिसांचा पाठलाग सुरुच असल्याने पोलिसांना घाबरवण्यासाठी या इसमाने आपल्याजवळील पिस्तूलाने जमिनीवर गोळ्या झाडल्या. मात्र पोलिसांनी न घाबरता काही अंतरावर त्याच्यावर झडप घालत त्याला अटक केली. सुरज शुक्ला असे या तस्कराचे नाव असून तो मध्यप्रदेश येथे राहणारा आहे. त्याच्याकडून 2 पिस्टल 2 मॅगझीन 16 काडतुस जप्त करण्यात आले आहेत. त्याने हे पिस्तुल कुणाला विकण्यासाठी आणले, कुणाकडून आणले ,आणखी काही पिस्टल याआधी विक्री केलेत का याबाबत पोलिसांनी तपास सुरु केला आहे.