मुंबई : आई-वडील आपली स्वप्न मुलांमध्ये पाहत असतात. त्यासाठी ते कठोर परिश्रम घेतात. मात्र स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी मुलांकडूनही जिद्द, चिकटीची जोड लागते. ती असेल तर कितीही संकटं असली तरी यशाचं शिखर सर केलं जातं. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील कन्हेरवाडी येथील रोहन जगताप आणि त्याच्या दिव्यांग वडिलांनी हे दाखवून दिलंय. वैद्यकिय प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या  'नीट' (NEET)  परीक्षेत  720 पैकी तब्बल 645 गुण मिळवत रोहनने EWS प्रवर्गातून देशात 407 वा क्रमांक पटकावला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत रोहनने हे नेत्रदीपक यश संपादन केलं.


रोहनचे वडील बिभीषण जगताप हे जन्मतः दोन्ही डोळ्यांनी अंध आहेत. कळंब येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयात सेवक म्हणून कार्यरत आहेत. तल्लख बुद्धिमत्ता असतानाही घरची परिस्थिती आणि शारीरिक मर्यादांमुळे त्यांना इच्छेप्रमाणे शिक्षण घेता आलं नाही. मुलाने शिकावं मोठं व्हावं अशी त्यांची इच्छा. वैद्यकीय प्रवेश परीक्षेत घवघवीत यश मिळवत रोहनने वडिलांची इच्छापूर्ती केली. त्याला पत्नी सुवर्णा जगताप आणि कुटुंबाची खंबीर साथ मिळाली. मुलाच्या शिक्षणासाठी घरातील कामासोबतच शेतातील जबाबदारी अशी दुहेरी कसरत त्यांनी पार पडली. अर्थातच त्यासाठी त्यांना कुटुंबाची सोबत होती.

रोहनचं प्राथामिक शिक्षण मूळ गावी म्हणजे कन्हेरवाडी येथील जि.प.च्या शाळेत झालं. त्यानंतर तालुक्याचं ठिकाण असलेल्या कळंब येथील सावित्रीबाई फुले विघालयातून 8 वी ते 10 पर्यंतचे माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं. दहावीच्या परीक्षेत रोहनने 95 टक्के गुणांसह घवघवीत यश मिळवलं. तर लातूर येथील दयानंद महाविद्यालयातून पुढील शिक्षण घेतलं. बारावीच्या परीक्षेतही 85 टक्के गुण मिळवले.  वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षेत  यशाचं शिखर गाठलंय.

'दहावीच्या परीक्षेत रोहन चांगले गुण घेणार हे माहीत होतं. त्यानं आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त गुण घेतले. त्यामुळे आमची जबाबदारी वाढली होती. त्याच्या शिक्षणात कोणती अडचण येऊ नये. त्याला अधिक गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा निर्धार आम्ही केला. रोहनला चांगलं शिक्षण मिळावं यासाठी लातूर येथील महाविद्यालयात पुढील प्रवेश घेतला', असं वडिलांनी सांगितलं.

लातूरच्या महाविद्यालयात प्रवेश घेतला मात्र खर्चाची चिंता कुटुंबाला अधिक होती. 'मुलाच्या शिक्षणासाठी पोटाला चिमटा काढला. वेळप्रसंगी सावकाराकडून कर्ज काढलं. मात्र रोहनला कोणत्याही गोष्टीची कमी जाणवू दिली नाही. पोरानं मेहनतीचं  चीज केलं', अशी भावना त्याच्या आईनं व्यक्त केली.

'वडिलांचा अपंगत्व लहानपणापासून पाहत आलो आहे. त्यांनी मला कोणत्या गोष्टीची कधी कमी जाणवू दिली नाही. मात्र सार्वजनिक जीवनात वावरताना त्यांना अनेक अडचणी येतात. त्यामुळे डॉकटर होण्याचं ठरवलं होतं. आई-वडिलांनी खूप कष्ट घेतलं आहे. पुढील अभ्यासही अधिक मेहनतीने पूर्ण करून एक चांगला डॉक्टर होणार असल्याचं रोहन म्हणाला.

संघर्षाला हवाय मदतीचा हात
बिभीषण आणि सुवर्णा जगताप यांना तीन मुलं आहेत. मोठी मुलगी बी ए तृतीय वर्षात शिकत आहे. आत्तापर्यंत काटकसरीने त्यांनी मुलाच्या शिक्षणाचा खर्च पेलला.  रोहनला शासकीय महाविद्यालयात प्रवेश मिळेल. मात्र तरीही त्यासाठी लागणारा खर्च त्यांच्या उत्पन्नाच्या आवाक्यात बसणारा नाही. त्यातच मुलीच्या लग्नाची चिंता त्यांना सतावत आहे. जन्मापासून आतापर्यंत संघर्ष केला. पुढेही करण्याची तयारी आहे. मात्र त्यांच्या संघर्षाला आता मदतीच्या हातांची गरज आहे.