नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र काँग्रेसच्या स्क्रिनिंग कमिटीच्या अध्यक्षपदावर ज्योतिरादित्य शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, के सी पाडवी यांच्यासह एकूण सहा जणांचा या कमिटीत समावेश करण्यात आला आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट वाटपाचं सगळ्यात महत्त्वाचं काम या समितीकडे असणार आहे. ज्योतिरादित्य शिंदे हे सरदार महादजी शिंदे यांच्या घराण्याचे वारस असून त्यांचे महाराष्ट्रासोबत खास कनेक्शन आहे. सातारा जिल्ह्यातील कण्हेरखेड हे शिंदे यांचे मूळ गाव. महाराष्ट्राच्या मातीशी भावनिक नातं असलेल्या ज्योतिरादित्य यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे.

राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस अध्यक्षपदासाठी जी नावे चर्चेत होती, त्यात ज्योतिरादित्य यांचेही नाव होते. लोकसभा निवडणुकीआधी प्रियांका गांधी यांच्यासोबत त्यांना उत्तर प्रदेश राज्यासाठी प्रभारी म्हणून नेमण्यात आलं होतं. पण लोकसभा निवडणुकीत त्यांना फारसा प्रभाव पाडता आला नाही. ते स्वतः गुणा या त्यांच्या पारंपरिक मतदारसंघातून यावेळी पराभूत ही झाले आहेत. त्यानंतर त्यांना महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्यात जबाबदारी देऊन हायकमांडने पुन्हा त्यांच्यावर विश्वास ठेवला आहे. ही जबाबदारी ते कशी पार पाडतात याकडे सगळ्यांचे लक्ष असेल. मागच्या वेळी म्हणजे 2014 च्या विधानसभा निवडणुकीवेळी स्क्रिनिंग कमिटीचे अध्यक्ष म्हणून मल्लिकार्जुन खर्गेंनी काम पाहिलं होतं.