रत्नागिरी : कोकण! निसर्गसंपन्नतेनं नटलेला प्रदेश म्हणून ओळख. इथं येणारा प्रत्येक जण कोकणच्या प्रेमात पडतो. निसर्गांनं मुक्त हस्तानं केलेली उधळण ही कोकणची ओळख. पण, कोकणातील पाऊस देखील तितकाच प्रसिद्ध आहे. कोकणात तुफान पाऊस कोसळतो. नद्या, नाले तुडूंब भरून वाहतात. डोंगर रांगांमधून धबधबे देखील प्रवाहित होतात. मागील आठ दिवसापासून कोकणात वरूणराजा जोरदार बॅटिंग करत आहे. त्यामुळे नद्या दुथडी भरून वाहत असून त्यांच्या पाणी पातळीमध्ये देखील वाढ झाली आहे. दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस झाला आहे. अद्याप जुलैचा महिना बाकी आहे. पण, जिल्ह्यात तब्बल 2042 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 1 जून ते 20 जूलै या कालावधीमध्ये 2042 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तर मागील 24 तासात जिल्ह्यात 102 मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे. जिल्ह्यात काही काळ पावसानं विश्रांती घेतली असली तरी पावसाच्या जोरदार सरी मात्र बरसत आहेत. शिवाय, 23 जुलैपर्यंत जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देखील हवामान विभागानं दिला आहे. 


कोणत्या तालुक्यात किती पाऊस? 


रत्नागिरी जिल्ह्यात 9 तालुके आहेत. या नऊ तालुक्यांमध्ये 1 जून ते 20 जुलै या कालावधीमध्ये चांगलाच पाऊस झाला आहे. मंडणगडमध्ये 2148, दापोलीमध्ये 1791, खेडमध्ये 2312, गुहागरमध्ये 2264, चिपळूणमध्ये 1795, संगमेश्वरमध्ये 1959, रत्नागिरी तालुक्यामध्ये 2334, लांजामध्ये 1950 आणि राजापूर तालुक्यामध्ये 1825 इतक्या पावसाची नोंद झाली आहे. अद्याप जुलै महिन्याचे 10 दिवस देखील बाकी आहेत. शिवाय, मुसळधार पाऊस देखील कोसळण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाल्यास नवल वाटण्याची गरज नाही. 


पावसाचा जनजीवनावर काय परिणाम? 


मुसळधार पावसामुळे जिल्ह्याच्या काही भागात जमिन खचणे, रस्ते खचणे, रस्ता वाहून जाणे, घरांना धोका निर्माण झाल्यानं काही लोकांना सुरक्षित स्थळी हलवणे अशा घटना घडल्या आहेत. शिवाय, संगमेश्वर तालुक्यात 2 तरूण बुडाले तर राजापूर तालुक्यामध्ये पुराच्या पाण्यात दोन जण वाहून देखील गेले आहेत. पावसाचा जोर वाढल्यानं राजापूर, माखजन बाजारपेठेत पाणी देखील शिरलं होतं. पण, पाऊस थांबल्यानंतर पाणी मात्र ओसरलं. पण, नदी किनाऱ्या या बाजारपेठा असल्यानं या बाजारपेठेंना वाढत्या पावसासोबत काळजी देखील घ्यावी लागते. कारण, पुराचं पाणी बाजारपेठेत शिरण्याचं धोका पावसाच्या जोराबरोबर आणखी वाढतो. सध्याच्या घडीला सुदैवानं मोठी दुर्घटना झालेली नाही. पुराचं पाणी ओसरल्यानं पुरग्रस्त भागातील जनजीवन देखील सुरळीत होत आहे. सध्याच्या घडीला काही भागात रिमझिम तर काही भागात पावसाच्या मुसळधार सरी बरसत आहेत.