पंढरपूर : पंढरीचा पांडुरंग हा लाखो वारकरी भक्तांचे आराध्य दैवत आहे. मंदिरात उभ्या असलेल्या सावळ्या विठुरायाच्या ओढीने हे विठ्ठल भक्त पंढरपूरला येत असतात . मात्र या विठूरायाची मूळ मूर्ती नेमकी कशी होती याबाबत सर्वच विठ्ठल भक्तांना जिज्ञासा आहे.


दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या दिवशी पंढरपूरमध्ये विठुरायाच्या रथोत्सव 1728 सालापासून सुरु झाला आहे . यात्रा काळात देवाच्या दर्शनाला लाखोंचा समाज पंढरपूरमध्ये येत असल्याने दवसभरात फारतर 60 ते 70 हजार भाविकांना देवाचे दर्शन घेता येते. अशावेळी आषाढी एकादशीला सर्वच भाविकांना दर्शन मिळावे यासाठी ही रथोत्सवाची परंपरा सुरु झाली आहे. पेशव्यांचे सरदार खाजगीवाले यांना देवाने दृष्टांत देऊन सर्व भक्तांना एकादशीच्या दर्शनासाठी मूर्ती असलेला रथाची नगर प्रदक्षिणा कर अशी मान्यता आहे . 


यानंतर खासगीवाले यांनी विठ्ठल मंदिरात असलेल्या मूर्ती प्रमाणे लहान पंचधातूची भराव मूर्ती 1728 साली बनवून घेतली आणि आज त्याच मूर्तीची नगरप्रदक्षिणा रथातून केली जाते . कालांतराने मंदिरातील देवाच्या मूर्तीवर होणारे अभिषेक व इतर कारणाने झीज सुरु झाली.  हे होताना देवाच्या मूर्तीवरील शुभ चिन्हे अस्पष्ट होत गेली. मात्र या खासगीवाले यांच्या रथ सोहळ्यामध्ये 1728 शाळातील मूर्ती जशीच्या तशी असून यावरील चिन्हे आजही मूळ मूर्ती प्रमाणे असल्याचे इतिहास अभ्यासक धनंजय रानडे यांनी सांगितले .


 या मूर्तीच्या एका हातात शंख, दुसऱ्या हातात कमलपुष्प , समचरण , छातीवर भृगु ऋषींनी मारलेल्या लाटेची खूण असे अनेक चिन्हे या मूर्तीवर आहेत. देवाच्या मूर्तीच्या मागील बाजूस देवाचे केशसंभार देखील या मूर्तीत दिसत आहेत. आषाढी आणि कार्तिकीला निघणाऱ्या रथामध्ये विठुराया सोबत राही आणि रखुमाई या दोन मूर्ती असतात. अभ्यासक रानडे यांनी विठ्ठल मंदिर, देवाची मूर्ती आणि पंढरपूरचा पुरातन इतिहास यावर खूप अभ्यास केलेला असून  त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 1728 साली विठुरायाच्या  मंदिरातील मूर्ती प्रमाणे  हि मूर्ती प्रतिकृती असेल तर यामुळे देवाच्या मूर्तीबाबत अजून चांगली माहिती समोर येऊ शकणार आहे.