Jwari Gehu rate: आपल्या ताटातली भाकरी आता महाग झाली आहे. ज्वारी, बाजरी, पिवळा, टाळकी ज्वारीचे दर सध्या पाच हजारांवर पोहोचले आहेत. तर गव्हाचे दरही चांगलेच वधारले आहेत. दरम्यान यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला अवकाळी पाऊस, त्यानंतर अतिवृष्टी, पुन्हा परतीच्या पावसाच्या जोराने ज्वारी, बाजरी, पिवळा, टाळकी ज्वारी या पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे बाजारात ज्वारी, टाळकी ज्वारी, पिवळा आणि बाजरीची आवक कमी झाली आहे. त्यामुळे ज्वारीचे दर 3 हजार प्रति क्विंटलवर तर टाळकी ज्वारी 6 हजारांवर आणि पिवळा तसेच बाजरी ही 4 हजारांवर पोहोचली आहे. 


गहूही तीन ते साडेतीन हजारांवर पोहचला आहे. दरम्यान मराठवाड्यात ज्वारीच्या पिकांचे नुकसान झाल्याने भाव ही चांगलेच वाढले आहेत. सध्या वाढत असलेल्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. परिणामी आता ज्वारी आणि बाजरीची भाकरही महाग झाली आहे. बहुतांश घरांमध्ये, हिवाळ्यात बदल म्हणून ज्वारी आणि बाजरीच्या भाकरीला विशेष प्राधान्य दिले जाते.


गेल्या वर्षी बाजरी आणि पिवळा ज्वारीचे दर दोन हजार दोनशे ते दोन हजार चारशे रुपये बाजारपेठेत दर होता. तर टाळकी ज्वारी ही 2 हजार आठशे ते 3 हजार प्रति क्विंटल दर होते. तर गव्हाचे दर प्रति क्विंटल 1500 ते 1800 रुपयांवर होते.


ग्रामीणसह शहरी भागात प्रामुख्याने ज्वारीची भाकरी खाल्ली जाते. सोबतच बाजरी, पिवळा ज्वारीची भाकरी ही आरोग्यदायी असते, त्यामुळे भाकरी खाणारांचे प्रमाण वाढत आहे. कारण पिवळा ज्वारी ही मधुमेहाचा रुग्णांसाठी व रक्तातील साखर कमी करण्यासाठी रामबाण समजली जाते. तर ज्वारी व टाळकी ज्वारीची भाकरी ही पोट विकारासाठी व विविध आजारातील रुग्णांसाठी खावे असे डॉक्टरही सांगतात.


पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाजरी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे राज्यातील विविध भागातून येणाऱ्या बाजरीचे नुकसान झालेय, त्यामुळे बाजरी बाजारात मिळत नाहीये. यामुळे बाजारामध्ये राजस्थानसह नाशिक व राज्यातील इतर भागातून बाजरी येत असते. मात्र, तिचेही दर गगनाला भिडले आहेत.


वाढलेली मागणी आणि कमी असलेला साठा लक्षात घेता ज्वारीचे दर चांगलेच वधारले आहेत. यामुळे बाजरीला पसंत करणाऱ्यांनी बाजरी घेण्याचे प्रमाण निम्म्यावर आणले आहे. दरवर्षी मका आणि कापसाचे कमी क्षेत्रात अधिक उत्पादन काढले जात आहे. त्या तुलनेत बाजरीचे क्षेत्र आणि उत्पादनही घटले आहे.





ही बातमी देखील वाचा


Maharashtra Cabinet : नोकरभरतीसाठी आता 'या' कंपन्या, भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा, मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब; कॅबिनेटचे 15 महत्वाचे निर्णय