मुंबई : महाविकास आघाडी भक्कम आहे, तुम्ही आम्हाला जेवढं डिवचाल तेवढं आम्ही जास्त जवळ येऊ, तुम्ही डिवचाल म्हणून आम्ही कोसळू असं होणार नाही अशी प्रतिक्रिया राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्या 6.45 कोटी रुपयांच्या संपत्तीवर आज ईडीने टाच आणली आहे. त्यावरुन राज्यातील राजकारण तापल्याचं चित्र आहे. 


मंत्री जितेंद्र आव्हाड भाजपवर टीका करताना म्हणाले, "विरोधकांनी सरकार अस्थिर करावं, पण ते अशा माध्यमातून करावं हे चुकीचं आहे. हे म्हणजे लोकशाहीचा मुडदा पाडण्याचं राजकारण आहे. अशा प्रकारे तपास यंत्रणेचा गैरवापर करुन जर राज्यातील सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरु असतील तर ते महाराष्ट्रातील जनता पाहत आहे. तुम्ही आम्हाला जेवढं डिवचाल तेवढं आम्ही जास्त जवळ येऊ, तुम्ही डिवचाल म्हणून आम्ही कोसळू असं होणार नाही."


ई़डीने आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्यावर कारवाई केली आहे. पुष्पक बुलियन या कंपनीची संबंधित एका प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.  जप्त केलेली ही मालमत्ता तब्बल 6.45 कोटी रुपयांची आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तामध्ये नीलांबरी प्रोजेक्ट्समधील 11 सदनिकांचा समावेश आहे. या सदनिका साईबाबा गृहनिर्मिती कंपनीच्या नावावर आहेत. साईबाबा गृहनिर्मिती ही कंपनी श्रीधर माधव पाटणकर यांच्या मालकीची आहे. श्रीधर पाटणकर हे रश्मी ठाकरेंचे भाऊ आहेत.


ईडीची ही कारवाई म्हणजे थेट ठाकरे परिवार ईडीच्या रडारवर आल्याचं मानलं जात आहे. ईडीने 2017 मध्ये पुष्पक बुलियन्सच्या विरोधात मनी लॉंडरिंगचा गुन्हा नोंदवला होता. पुष्पक बुलियन्सची तब्बल 21 कोटी रुपयांची मालमत्ता यापूर्वीच जप्त करण्यात आली आहे. ही मालमत्ता महेश आणि चंद्रकांत पटेल यांच्या मालकीची होती.


संबंधित बातम्या: