Sanjay Shirsat : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मंगळवारी महापत्रकार परिषद घेऊन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narwekar) आमदार अपात्रता प्रकरणात (Shiv Sena MLA Disqualification Case)  दिलेला निकाल कसा चुकीचा होता याबाबतचे दावे केले. त्यावेळी त्यांच्यासोबत ठाकरे गटाचे प्रमुख नेते आणि कायदेतज्ज्ञ असिम सरोदे (Asim Sarode ) आणि सर्वोच्च न्यायालयाचे वकील रोहित शर्मा हे उपस्थित होते. यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे गटावर पलटवार केला. यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 


संजय शिरसाट म्हणाले की, आजची महापत्रकार परिषद नव्हती. ⁠तर तो एक इव्हेंट होता. ⁠त्यात ड्रामा, हास्य जत्रा हे सर्वच होते. ⁠संजय राऊत जिंकले आणि उद्धव ठाकरे हारले. ⁠असिम सरोदे हे एका प्रवक्त्याप्रमाणेच बोलत होते. ⁠संजय राऊत यांची जागा घेत आहेत असिम सरोदे घेताय की काय? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. असिम सरोदे यांना सुप्रीम कोर्ट यांनी १ लाखांचा दंड ठोठावला होता, असेही शिरसाट म्हणाले. 


त्यापेक्षा त्यांनी सुप्रीम कोर्टाची लढाई लढावी


ते पुढे म्हणाले की, ⁠एकनाथ शिंदे यांचा फोटो त्यांनी दाखवला. ⁠आम्हाला मेजॉरिटी ही विधान भवनात दाखवायची होती. म्हणून आम्ही कुठून आलो याला महत्त्व नाही. ठाकरे गट ⁠जी काही वाक्य वापरत आहे त्यापेक्षा त्यांनी सुप्रीम कोर्टाची लढाई लढावी. ⁠संजय राऊत गरळ ओकत आहेत. उद्धव ठाकरे यांची इमेज कमवत नाही तर घालत आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली. जो व्हिडीओ आहे त्या संदर्भात आमचा आक्षेप नाही. ⁠उद्धव ठाकरे यांनी केलेले आरोप या टेक्निकल बाजू आहेत. त्यांनी त्या सुप्रीम कोर्टाने मांडाव्यात, असेही त्यांनी यावेळी म्हटले. 


काय म्हणाले उद्धव ठाकरे?


गेल्या आठवड्यात लबाडाने नव्हे तर लवादाने एक निर्णय दिला, पण शिंदे आणि नार्वेकरांनी लोकांमध्ये यावं, मीही येतो, आणि त्यांना विचारावं की शिवसेना कुणाची? मग लोकांनी ठरवावं कुणाला तोडावं, लाथाडावं आणि कुणाला निवडावं असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर सडकून टीका केली. 


ही लढाई आता केवळ शिवसेनेची राहिली नाही तर ही सर्व देशाची लढाई आहे, लोकशाही जिवंत राहणार की नाही, सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार अस्तित्वात राहिल की नाही याची लढाई असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे म्हणाले की, फाशीचा निर्णय हा न्यायालय सुनावतं, पण त्याची अंमलबजावणी ही जल्लादाकडे दिली जाते. या कटाच्या अंमलबजावणी ही नार्वेकर नावाच्या जल्लादाकडे दिली होती. निवडणूक आयोग म्हणजे तर दिव्यच आहे. ज्या महाराष्ट्रात रामशास्त्री प्रभुणे जन्माला आले, संविधान लिहिलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला, त्याच महाराष्ट्रातून विरोधी पक्षांना संपवण्याचं काम यांनी सुरू केले असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. 


काय म्हणाले राहुल नार्वेकर? 


उद्धव ठाकरे यांच्या कार्यक्रमाला पत्रकार परिषद म्हणावी की दसरा मेळाव्याचं भाषण म्हणावं हे समजत नाही. मला अपेक्षा होती की, माझ्याकडून जर काही राहिलं असेल किंवा चुकलं असेल तर त्यावर बोललं जाईल. पण त्यांनी शिव्या देणं, राज्यपालांना फालतू म्हणणं, सर्वोच्च न्यायालयाला काहीही बोलणं आणि निवडणूक आयोगासारख्या संविधानिक संस्थांविषयी चुकीचे शब्द वापरले. ज्या लोकांना संविधानिक संस्थांवर विश्वास नसेल तर त्यांचा संविधानावर कसा विश्वास असू शकतो असा प्रश्न पडतो. 


निकाल दिल्यानंतर हे स्पष्टीकरण द्यायची गरज नाही, पण लोकांमध्ये या संविधानिक पदावर विराजमान असलेल्या व्यक्तीबद्दल गैरसमज पसरवला गेला तर ते योग्य नाही, म्हणून आपण हे स्पष्टीकरण देत आहोत, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलं. 


आणखी वाचा 


Uddhav Thackeray : राहुल नार्वेकरांनी अन्यायाचं नाव न्याय ठेवलं; महापत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंकडून चिरफाड, राहुल नार्वेकरांवर हल्लाबोल